‘मुळशी पॅटर्न’ च्या यशानंतर प्रविण तरडे घेऊन येत आहे ‘देऊळ बंद २’

Foto

औरंगाबाद- ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ सारखे वेगळे चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेले लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे देऊळबंदचा सिक्वेल घेऊन येत आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ‘सांजवार्ता ऑनलाईनच्या’ फेसबुक लाईव्ह मध्ये शनिवारी (ता.२४) दिली. प्रविण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त ते औरंगाबादमध्ये सांजवार्ताच्या कार्यालयात आले होते. यावेळी सांजवार्ता ऑनलाईनचे सागर चितलांगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

‘मुळशी’ या गावाभोवती फिरणारी मुळशी पॅटर्नची कथा ही देशातील अनेक शहरांची प्रातिनिधिक कथा असल्याचा प्रविण तरडे म्हणाले. टुमदार गावांचे औद्योगिकीकरणानंतर शहरीकरण होत आहे. शेताचा मालक असलेला शेतकरी भूमिहीन होऊन आपल्याच शेतात उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतीचा वॉचमन बनत आहे. त्याची मुलं बेरोजगार होतात आणि शहरातील गुंडांच्या हाताचे बाहुले बनतात. त्यातून ती बाहेर येतात की नाही, याची ही कथा असल्याचे प्रविण यांनी सांगितले.

प्रविण तरडे यांनी ‘सांजवार्ता ऑनलाईन’ टिमशी दिलखुलास गप्पा मारल्या. चित्रपटातील ‘भाईटम’ साँग देखील ते गायले. या गाण्यात दाखवण्यात गुंडांमुळे हे गाणे वादग्रस्त ठरले होते. तो भाग चित्रपटातून वगळण्यात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

‘तलवारीने केक कापू नका’

चित्रपटात गुंड हे तलवारीने केक कापताना दाखवण्यात आले आहे तसे कोणीही करु नये, असे नम्र आवाहन प्रविण यांनी केले. रस्त्यावर, मैदानात कोणीही असे स्टंट करु नका. हे गाणे तुमच्या घरात लावून वाढदिवस साजरा करा असे प्रविण तरडे म्हणाले.

सामाजिक विषयांचे चित्रपट

‘देऊळबंद’ हा अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा चित्रपट होता. आता त्याचा सिक्वेल ‘देऊळबंद-२ आता परीक्षा देवाची’ हा आगामी चित्रपट घेऊन येत असल्याचे प्रविण यांनी रिव्हेल केले. हे सर्वात प्रथम ‘सांजवार्ता ऑनलाईन’ वर सांगत असल्याचे प्रविण यांनी सांगितले.