साहेब, रुपयाला जुडी देतो घ्या हो ! घराकडे जायलाही पैसे नाहीत!

Foto
औरंगाबाद :- दोन महिन्यांपूर्वी पंधरा ते वीस रुपये जोडीजुडी या भावाने विकल्या गेलेल्या मेथी -पालक या भाजीला आता भावच उरला नाही. जाधवमंडीत काल अक्षरशः 1 रुपयाला जुडी घ्या म्हणून शेतकरी राजा ग्राहकांना  विनवणी करीत होता. मेथीचा भलामोठा गठ्ठा वाहनातून आणून विकल्या न गेलेल्या शेतकर्‍याच्या डोळ्यात अश्रू तरळले.
साहेब, 1 रुपयाला मेथीची जुडी देतोय घ्या हो, घरला जायला पैसे नाहीत, अशी अर्जवच त्याने केली. यावर्षी परतीच्या पावसाने कृपा केली अन् रब्बी हंगाम चांगला आला. मात्र खरीप हंगामातील पिके हातची गेल्याने शेतकरी अजूनही कर्जाच्या विळख्यात आहेत. शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकविला जातो. शेतकरी दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या बाजारात भाजीपाला घेऊन येतात. डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी मेथी, पालक, चुका  शेपू यासह वांगे, बटाटे, टोमॅटो, भेंडी अशा सर्वच भाज्यांना चांगला भाव मिळत होता. मेथीची जुडी तर 15 ते 20 रुपयांना विकली गेली. वांगी 50 ते 60 रुपये, टमाटे 30 ते 40 रुपये, बटाटे 40 ते 50 रुपये कांदे 100 ते 150 रुपये, भेंडी 70 ते 80 रुपये किलो असा दर मिळत होता. हिरवी मिरची ही 50 ते 60 रुपये किलोने विकली गेली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरात दोन पैसे पडले. मात्र गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्यांचे भाव घसरले आहेत. सर्वच भाजीपाल्यांचा दर आता निम्म्यावर येऊन पोहोचला आहे. पालेभाज्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
 साहेब, रुपयाला जुडी घ्या हो!
 मेथीच्या भाजीचे  मोठे गाठोडे समोर ठेवून घामाघूम झालेल्या शेतकर्‍यांने एका ग्राहकाला अक्षरश: हात जोडले. साहेब, रुपयाला एक देतो,  घ्या ना ! अशी अर्जवच त्याने केली. ग्राहकालाही शेतकर्‍याची दया आली. त्याने पाच रुपयाच्या पाच जुड्या विकत घेतल्या. तेव्हा शेतकरी म्हणाला, साहेब बाजारात भाजीपाला आणण्यापेक्षा जनावरांनाच खाऊ घातलेला बरा ! बाजारात येऊनही दाम मिळत नाही. चार महिने रात्र-रात्र पाणी भरून मेथी जगवली. आता भाव कोसळले. पिकवले ते विकलेही जात नाही, असे म्हणत त्याच्या डोळ्यात आसवे तरारली होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker