सामाजिक विषय हीच माझ्या चित्रपटांची ओळख- प्रविण तरडे

Foto

औरंगाबाद- चित्रपटांचा विषय सामाजिक नसेल तर त्या चित्रपटांना अर्थ काय? त्यामुळे सामाजिक विषय नसलेले चित्रपट मी करतच नाही अशी भूमिका दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांनी सांजवार्ता ऑनलाईनच्या फेसबुक लाईव्ह वरुन मांडली. त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते औरंगाबादमध्ये आले असता त्यांनी सांजवार्ता कार्यालयास भेट दिली.

देऊळ बंद सारख्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर आणि रेगे चित्रपटाच्या संवादलेखनानंतर प्रविण तरडे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. प्रविण तरडे हे सांजवार्ताच्या कार्यालयात आले असता त्यांनी सांजवार्ता ऑनलाईनच्या टीम सोबत दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यावेळी त्यांना ‘देऊळ बंद’ ते ‘मुळशी पॅटर्न’ या प्रवासाविषयी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देतांना ते म्हणाले की, चित्रपटाचे विषय हे सामाजिक प्रश्नांना हात घालणारे असतील तरच मी चित्रपट बनवतो. देऊळ बंद या चित्रपटात अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातली, रेगे चित्रपटासाठी संवाद लिहिले, आणि आता शेतकऱ्यांचे असे विषय जे आजपर्यंत दाखवले गेले नाहीत अशा संवेदनशील विषयावर आधारीत ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहे. त्यामुळे अध्यात्म विज्ञानाची सांगड आणि आता सामाजिक प्रश्न हे विषय  मी मनापासून निवडले असल्याने माझा हा प्रवास अगदी सोपा राहीला असे प्रविण म्हणाले.

आजपर्यंत आत्महत्या हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे बोलले जाते मात्र असे नसून आत्महत्या हा शेतकऱ्यांनी त्यांच्या अनेक प्रश्नांवर शोधलेला क्लेशदायक असा उपाय आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून शेतकऱ्यांचा असा प्रश्न जो आजपर्यंत कोणाच्याही लक्षात न आला नाही तो या चित्रपटात मांडला आहे असा दावा प्रविण तरडे यांनी यावेळी केला. या चित्रपटाचे नाव ‘मुळशी पॅटर्न’ असे असले, तरी या चित्रपटातून देशातील सर्वच शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत असे देखील प्रविण म्हणाले.

‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शुक्रवारी(ता.२३) प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात धाव घेतली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker