एटीएमची सुरक्षा वार्‍यावर: दोन दिवसांत घडल्या दोन घटना... शहरातील अनेक एटीएम सेंटर सुरक्षारक्षकाविना

Foto
औरंगाबाद : चोरट्यांनी आतापर्यंत एटीएम फोडून पैसे पळविल्याच्या घटना समोर आल्या आहेत;परंतु आता तर चोरट्यांनी चक्‍क एटीएमच पळविल्याची घटना शहरात घडल्याने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बीड बायपास रोडवरील दत्त मंदिरासमोरील एसबीआय बँकेचे एटीएमच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळविल्याची धक्‍कादायक घटना घडली. या एटीएममध्ये 25 लाख 14 हजार 700 रुपयांची रक्‍कम होती.

एटीएम सेंटरमध्ये घुसून एटीएम मशीन तोडण्याच्या घटना याआधीही शहरात घडल्या आहेत. गजानननगर परिसरात काही महिन्यांपूर्वीच अशी घटना घडली होती. आता तर चक्‍क शहरातील बीड बायपास रोडवरील दत्त मंदिरासमोरील ऋतुपर्ण बिल्डिंगमधील भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) एटीएमच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळविल्याची धक्‍कादायक घटना घडली. बीड बायपास हा वर्दळीचा आणि गजबजलेला रस्ता आहे. याच रस्त्यावर दत्त मंदिरासमोरील ऋतुपर्ण इमारतीत एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. त्या ठिकाणी दोन एटीएम आहेत.

एटीएम सेंटरच्या परिसरात व्यापारी संकुल आणि एक मंगल कार्यालय असून, दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आहे. एसबीआयच्या एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याची संधी साधून शुक्रवारी (12 जुलै) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करत जमिनीत नटबोल्टच्या साहाय्याने मजबूत रोवलेले 400 किलो वजनाचे मशीन उखडून मागील दोन वायर कापून एटीएम मशीन लंपास केली. शनिवारी सकाळी हा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पळवून नेलेल्या एटीएममध्ये 25 लाख 14 हजार 700 रुपये होते, तर त्याच्याजवळील 12 लाख 4 हजार रुपये असलेल्या दुसर्‍या मशीनला चोरांनी हातसुद्धा लावला नाही. एसबीआयतर्फे राज्यातील सर्व एटीएम सेंटरची देखभाल व सुरक्षेचे काम इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारीच या मशीनमध्ये 10 लाख रुपये भरण्यात आले होते. त्यापूर्वीची रोख रक्‍कम मिळून त्यात 25 लाख 41 हजार 700 रुपये होते. यापैकी 27 हजार रुपये ग्राहकांनी काढले होते. ज्या एटीएममध्ये सर्वाधिक पैसे होते, तेच मशीन चोरांनी पळवले.  

शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पांढर्‍या रंगाची चारचाकी गाडी एटीएम सेंटरसमोर आली. त्यानंतर निळे जॅकेट, हेल्मेट घातलेला व हातात स्प्रेची बाटली असलेला एक चोर व निळी टोपी घातलेला दुसरा चोर आत शिरला. त्याने लाइट व सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाच्या शाईचा स्प्रे मारला. एटीएम मशीन समोरील दोन बाजूंनी जमिनीत रोवलेले होते. चोरट्यांनी ते मुळापासून वर काढले. मागच्या बाजूचे वायर कापले. त्यानंतर दुकानाच्या समोरील बाजूने असलेले फायबर, काचेचे आवरण तोडून एटीएम बाहेर नेत पांढर्‍या रंगाच्या गाडीत टाकून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन आसपासच्या सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये एक पांढर्‍या रंगाच्या गाडीतून एटीएम मशीन चोरून नेत असल्याचे समोर आले आहे.

 एटीएम सेंटरवर सुरक्षा वाढवा
अनेक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी विविध बँकांनी शहरात एटीएम व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. काही ठिकाणी एटीएम सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक चोवीस तास देखरेख करत असतात;परंतु काही ठिकाणी मात्र एटीएमबाहेर सुरक्षा रक्षकही नसतात आणि कॅमेरेही नावालाच असतात. याचाच फायदा चोरटे घेतात. याशिवाय काही एटीएम निर्मनुष्य ठिकाणी असतात. त्या ठिकाणी सर्वाधिक सुरक्षा देण्याची गरज आहे. सुरक्षारक्षकाबरोबर कॅमेरे सुरू आहेत की नाही, याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बँक प्रशासनाने सर्व एटीएमची पाहणी करून सुरक्षा वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पाळत ठेवून चोरी  
ऋतुपर्ण या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कॅनरा बँक असून, त्या बँकेचे एटीएम सेंटर याच एसबीआय एटीएम सेेंटरच्या शेजारी आहे. कॅनरा बँकेच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर गेल्या दीड महिन्यापासून खराब असल्याने त्याचे चित्रण बंद आहे. त्यामुळे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाही. एटीएम सेंटरमधून पळविलेल्या सदर मशीनला फक्‍त वीज आणि इंटरनेट कनेक्शनचे वायर लावलेले होते. ही मशीन एकाच वायरवर जमिनीत रोवली होती. सुरक्षा रक्षक नसलेल्या या एटीएम सेंटरवर चोरट्यांनी पाळत ठेवूनच ही चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. या एटीएमची देखभाल करणार्‍या कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉस्ट कटिंगमुळे मागील काही महिन्यांपासून सायरन तसेच सुरक्षा रक्षक ठेवणे बहुतांश ठिकाणी बंद करण्यात आले आहे. या एटीएम सेंटरमधील सायरन का बंद होता, सुरक्षा रक्षक का ठेवला नव्हता, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker