आदेश बांदेकर यांची उद्यापासून ‘माऊली संवाद’ यात्रा

Foto
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या वतीने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा काढली आहे, तर भाजपतर्फेही महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आज दुपारी मोंझरी येथून प्रारंभ होणार असून, आता शिवसेनेचे सचिव आणि 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर यांची उद्यापासून 'माऊली संवाद' यात्रा सुरू होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणार्‍या जनतेचे आभार मानण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. आदित्य यांनी गेल्या महिन्यात या यात्रेला सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेपाठोपाठ, भाजपच्या वतीने आजपासून राज्यात महाजनादेश अर्थात जनतेचा सर्वात मोठा कौल या आशयाखाली यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ हजारहून अधिक किलोमीटर प्रवास करणार आहेत. ही यात्रा ३२ जिल्ह्यांतून जाणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे.  विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकरी, कष्टकरी व समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने २ ऑगस्टपासून माऊली संवाद यात्रा काढण्याचे ठरवले आहे.