लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Foto
औरंगाबाद: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादनाकरिता जनसागर लोटला होता. यावेळी हातात पिवळे झेंडे घेतलेल्या युवकांच्या अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो....., जय लहुजी...  अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला.

लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्या करिता सकाळपासूनच शहरभरातून नागरिक दाखल होत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी आमदार कल्याण काळे, मराठवाडा विकास मंडळाचे भागवत कराड, बाबुराव कदम, राजेंद्र जंजाळ, विजय साळवे, विजय औताडे, दौलत खरात, किशोर थोरात, विजय मगरे आदी मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. प्रसंगी सर्वपक्षीय उत्सव समितीच्या व्यासपीठावर पंचशीला भालेराव व ग्रुप यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचे व भीमगीतांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसंगी इथे गाजले दोनच राजे..., भीमराज कि बेटी.. मे तो जय भीम वाली हु... या गीतांवर तरुणाईसह महिलांनी चांगलाच ठेका धरला होता.  यावेळी पँथर्स रिपब्लिकन पार्टी, भारिप बहुजन महासंघ, काँग्रेससह आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या, नेत्यांचा वतीने अभिवादन करण्यात आले. प्रसंगी सर्वपक्षीय जिल्हा उत्सव समितीतील विलास सौदागर, रमेश चांदणे, कमलेश चांदणे, दीपक बिरारे, भास्कर पारधे, अजित राजहंस, अशोक गायकवाड, लक्ष्मण हिवाळे, संदीप वाघुले, अजय साळवे, विशाल आठवले, अतुल कांबळे आदींची उपस्थिती होती.