मनपा अधिकार्‍यांचा स्वेच्छानिवृत्तीकडे वाढतोय कल; दोघांची स्वेच्छानिवृत्ती, एकाचा राजीनामा, तिघे स्वेच्छानिवृत्तीच्या मार्गावर

Foto
औरंगाबाद : स्थानिक सत्तेचे केंद्र मानली जाणारी महानगरपालिका विविध कारणांनी कायमच चर्चेत असते. एकीकडे मनपाच्या विविध विभागात अधिकारी-कर्मचार्‍यांची तोकडी संख्या असताना दुसरीकडे सेवानिवृत्त होणार्‍यांची व स्वेच्छानिवृत्ती घेणार्‍यांची संख्या मात्र वाढत आहे. या वर्षभरात आजवर दोघांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर एकाने राजीनामा दिला. विविध विभागातील आणखी तीन अधिकारी स्वेच्छानिवृत्तीच्या वाटेेवर असल्याचे सूत्रांकडून समजते.  
महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात असलेल्या तब्बल 115 वॉर्डात विकासाची अनेक कामे केली जातात. एकीकडे महानगरपालिकेत अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. दुसरीकडे सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच भर म्हणजे मनपातील अधिकार्‍यांचा स्वेच्छानिवृत्तीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. 

 गेली अनेक वर्षे मनपात सेवा बजावलेले अनेक अनुभवी अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, यंदा 2019 मध्ये मनपातील तब्बल 35 जण सेवानिवृत्त होत आहेत. यात विभागीय अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, वाहन चालक, दुय्यम आवेक्षक, आरोग्य निरीक्षक, वॉर्ड अधिकारी आदींचा समावेश आहे. या 35 पैकी 23 जण जूनअखेरपर्यंत सेवानिवृत्त झालेले आहेत, तर उर्वरित 12 जण येत्या डिसेंबरअखेरपर्यंत सेवानिवृत्त होणार आहेत. याबरोबरच दोघांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली असून, एकाने राजीनामा दिलेला आहे. यात शाखा अभियंता एस. एस. कुलकर्णी व कनिष्ठ लिपीक संतोष थट्टेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून, अनुरेखक देविदास डोईफोडे यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. आणखी तिघे स्वेच्छानिवृत्तीच्या वाटेवर असल्याचे समजते. यात डी.पी. कुलकर्णी, एम.बी. काझी, नगररचना विभागात कार्यरत असलेल्या आणखी एका अधिकार्‍याचा समावेश असल्याचे सूत्रांकडून समजते.

अधिकार्‍यांच्या स्वेच्छानिवृत्तीची कारणे
 एक तर महापालिकेत अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. तोकड्या मनुष्यबळात अधिकार्‍यांना काम करावे लागत आहे. यातच कामाचा अतिरिक्‍त बोजा, वाढते वय, प्रत्येक कामात असणारा राजकीय दबाव व पावलो-पावली पदाधिकार्‍यांचा वाढता हस्तक्षेप आदी कारणांमुळे मनपातील अधिकारी आणि कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे बोलले जात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker