उलटा चष्मा ; अन गांधी भवन गहिवरले...

Foto
शहराच्या मोजक्याच वैभवांपैकी एक असलेले गांधी भवन काल अक्षरशः गहिवरले. गांधी भवनाला मोठा राजकीय, सामाजिक वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या चळवळींचे केंद्र राहिलेले गांधीभवन शहराच्या सामाजिक राजकीय आर्थिक विकासाचे साक्षीदार आहे. अनेक देशभक्त -राष्ट्रभक्त आणि समाजसेवक याच गांधी भवनाने घडवलेले आहेत. आजही प्रत्येक शहरवासीय गांधी भवनाकडे आदरयुक्त नजरेने बघतो. या वास्तूत प्रवेश केल्यानंतर जी अनामिक देशभक्तीची भावना जागृत होते त्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. बदललेल्या काळातही गांधी भवनाने आपले श्रेष्ठत्व आणि आणि पावित्र्य जपलेच आहे, यात शंका नाही. काँग्रेस आणि गांधी भवन हे अतूट नातेच. गांधी भवनाचा आशीर्वाद असल्याशिवाय कुणाचीच राजकीय कारकीर्द सुरू होत नाही, हेही तितकेच खरे ! राजकारणाची एबीसीडी कुठून शिकावी हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर गांधी भवनात या, असे सांगितले जाई.

 काळ बदलला तशा राजकीय रिती-भाती बदलल्या. आता तर राजकारण म्हणजे निव्वळ थिल्लरपणा झालाय.  गेल्या दोन दिवसात जी चर्चा प्रत्येक शहरवासीय करतोय ती पाहता कुठे नेऊन ठेवले गांधीभवन माझे ? हे म्हणण्याशिवाय पर्याय उरत नाही. ज्या गांधी भवनातून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला अथवा राजकीय बळ आणि यश मिळविले. त्याच गांधी भवनातील खुर्च्या पळविण्याचे पाप राज्यमंत्रीपद भोगलेल्या एका काँग्रेसच्या नेत्यांनी करावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ! अहो, किती थिल्लरपणा कराल. अवघ्या दहा हजारांसाठी पक्षाची आणि गांधी भवनाची इज्जत वेशीवर टाकणाऱ्यांनो, तुमच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागलीच म्हणूनच समजा !  हाच गांधीभवनाचा शाप आहे. बरे, राजकीय चतुरपणा असावा की नाही. शहरातील काँग्रेसच्या नेत्यांनी हा प्रकार उजागर होऊच कसा दिला. एखाद्याने दहा हजार रुपये खर्च करून खुर्च्या आणून ठेवल्या असत्या तर बिघडले कुठे असते. मात्र राजकारण किती द्वेषाचे आणि त्वेषाचे असते याचा परिपाठ या नेत्यांनी दाखविला. ज्या गांधीभवनाने देशभक्तीची, राष्ट्रनिष्ठेची, एकतेची शपथ दिली 
त्याच गांधी भवनाच्या शिलेदारांनी बेकीचा अस्सल परिपाठ शिकला कसा ? पक्षांतर्गत या बाबी चव्हाट्यावर आणण्यामागे कुणाचा काय  उद्देश आहे. हे लक्षात घेतले तर काँग्रेस पक्ष किती रसातळाला गेला याचा बोध होतो. सत्तार उद्दामपणे म्हणाले, माझ्या खुर्च्या मी घेऊन गेलो. तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नावावर ज्यांनी त्यांना ठसाठसा मतदान केले ते हजारो कार्यकर्ते ढसाढसा रडले असतील यात शंका नाही. किती बेमुर्वतखोर असावं, याची जराही चाड सत्तारांना नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. काही असो या गांधी भवनाचे पावित्र्य जपण्याची शपथ आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, हाच या घटनेवर जालीम तोडगा असू शकतो यात शंका नाही.

 दानवेंची जीभ की घसरगुंडी... 

अस्सल ग्रामीण अन रांगड्या भाषेने अनेकांची मने जिंकणारे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काल पुन्हा घसरले. पाकिस्तानने भारताचे चाळीस अतिरेकी मारले, असे म्हणून वाद ओढवून घेतला. आता खरे तर ही अनावधानाने झालेली चूक ! मात्र राजकीय तापमानाचा पारा टिपेला पोचलेला असताना अशा चुकीचे विरोधक भांडवल करणारच.  रावसाहेब दानवेंची जीभ की घसरगुंडी ! असेच आता म्हणावे लागेल. गेल्या दोन-तीन वर्षात रावसाहेबांची जीभ वारंवार घसरतेय. तुरीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना साले संबोधून प्रचंड वाद निर्माण केला होता. त्यावेळीही रावसाहेबांची चहूबाजूने धुलाई झाली. स्पष्टीकरण देता देता त्यांना नाकी नऊ आले. आताही अतिरेकी शब्दाने साहेबांची धुलाई होत आहे. पक्षही अडचणीत आला आहे. मी असे म्हणालोच नाही कुणी तरी छेडछाड करून तो व्हिडिओ बनवला असे स्पष्टीकरण रावसाहेब आणि त्यांचा पक्ष देत आहे.मात्र जो बुंद से गयी वो हौद से नही आती..हेच खरे ! 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker