झारखंडची एजन्सी उद्यापासून पकडणार मोकाट कुत्रे

Foto
औरंगाबाद: एकीकडे शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढत असताना निरबीजिकरन करण्याची शस्त्रक्रिया करण्याची झारखंड येथील एजन्सीची संचिका आयुक्तांकडे धूळखात पडली असल्याचा प्रकार समोर आला होता.  महापौर नंदकुमार घोडेले यांनी ११ जुलै रोजी निविदा प्रक्रियेनुसार अंतिम झालेल्या झारखंड येथील एजन्सीला स्थायी समिती मान्यतेच्या अधिन राहून दहा दिवसात संस्थेला  काम सुरू करण्याचे सांगितल्यानंतरही काम सुरू होऊ शकले नव्हते. आज शुक्रवारी या कंपनीला पत्र मिळाल्यानंतर उद्या शनिवारपासून शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याचे काम संबंधित कंपनी सुरू करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

गेल्या काही वर्षांपासून शहरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला होता. या मोकाट कुत्र्यांचा द्वारे अनेक ठिकाणी नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार घडल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर गेल्या वर्षी पुण्याच्या ब्ल्यु क्रॉस एजन्सीला शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रीयेचे कंत्राट दिले होते. वर्षभरात त्यांनी तीन हजारांवर शस्त्रक्रिया केल्या. तीन महिन्यांपूर्वी ३१ मार्च रोजी या संस्थेचा करार संपुष्टात आल्याने मनपा प्रशासनाच्या वतीने टेंडर प्रक्रीया राबविण्यात आल्या नंतरही  दोन्ही वेळा प्रतिसाद  मिळाला नाही. यामुळे तिसर्‍यांदा निविदा काढण्याची नामुष्की प्रशासनावर आली. झारखंडच्या ‘हेल्थ ऑर्गनायझेशन फॉर पिपल्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल ट्रस्ट’ या एजन्सीची एकमेव निविदा आली खरी पण गेल्या दोन महिन्यांपासून ही संचिका आयुक्तांच्या स्वाक्षरी करता तशीच पडून असल्याचा प्रकार समोर आला होता. संबंधित कंपनीची संचिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर स्थायी समितीसमोर येईल, तिथे मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात येतील़. दरम्यान या सर्व प्रक्रियेत शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छांद पुन्हा वाढला आहे़.