महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचाय : उद्धव ठाकरे

Foto
जालना : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्यात तर भयानक दुष्काळ आहे. अशा परिस्थितीतही जनतेने शिवसेना-भाजप युतीला भरघोस मतांनी विजयी केले. आता दुष्काळ निवारणासाठी एकजुटीने काम करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र तसेच मराठवाडा सुजलाम सुफलाम् करण्यासाठी नेटाने प्रयत्न करू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. साळेगाव (जि. जालना) येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना ते बोलत होते.

 यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर,  माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. जयदत्त क्षीरसागर माजी आमदार संतोष सांबरे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. या वर्षीच्या भीषण दुष्काळाचा सामना करणे अवघड आहे. मात्र शिवसेनेने खारीचा वाटा उचलत दुष्काळग्रस्तांना मदत केली. नवे सरकार नदीजोड प्रकल्प पूर्ण करून मराठवाड्याला सुजलाम-सुफलाम करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलणार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 खैरे यांचा पराभव हा माझा पराभव..! 
लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे यांचा पराभव निश्चितच जिव्हारी लागणारा आहे. खैरे कडवे शिवसैनिक असल्याचे सांगतानाच खैरे यांचा पराभव हा माझा पराभव असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.