आजपासून मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार; स्कायमेटचा अंदाज

Foto
औरंगाबाद: राज्यातील विविध भागात मनसोक्त बरसत असलेल्या मान्सूनने मराठवाड्याकडे मात्र पाठ फिरवली आहे. सुरुवातीला झालेल्या थोड्या पावसावरच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. आता मात्र, पिकांनी माना टाकायला सुरवात केली असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारपासून (दि.१९) मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेटने वर्तवलेला अंदाज खरा ठरला तर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. 

स्कायमेटकडील माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण आणि गोवा येथे पावसात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: मुंबईसह उत्तर कोकण आणि गोव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा वगळता पुढील २४ तासांत महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कमी राहील. १९ जुलैदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीपासून सरकणाऱ्या चक्रवाती प्रणालीमुळे हा पाऊस पडेल. २१ आणि २२ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होईल. या काळात महाराष्ट्रातील अंतर्गत भागांत मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे.