मराठवाडा पुन्हा होरपळणार; तापमानात वाढ होण्याचे हवामान खात्याचे संकेत; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Foto
औरंगाबाद: राज्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. विशेषतः विदर्भ-मराठवाड्यात १९ मे नंतर तापमानात मोठी वाढ होणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. दोन आठवड्यापूर्वी औरंगाबाद, जालना या जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान ४३ अंशाच्याही पुढे पोहचले होते. येत्या आठवड्यातही तशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.  या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १८ ते २१ मे दरम्यान कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker