मराठवाड्याचे दुष्टचक्र संपेना ! अजूनही ही ३७ हजार जनावरे चारा छावण्यात तर तब्बल २२६३ टँकर सुरु

Foto
 औरंगाबाद: पावसाळा निम्म्यावर संपत आला तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली सह जालना, बीड, औरंगाबाद हे जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यात अजूनही ५४ छावण्या सुरु असून त्याच ३७ हजारांहून अधिक जनावरे दाखल आहेत. यावरून परिस्थितीची कल्पना येते.

 गत वर्षीच्या दुष्काळाने मराठवाड्याचा अक्षरश: टॅंकर वाडा झाला होता. जवळपास सर्व जिल्ह्यात शेकडो गावांना टँकरद्वारे पाणी पोहोचवावे लागले. या वर्षी तरी निसर्ग कृपा करेल अशी आशा होती. मात्र निम्मा पावसाळा संपत आला तरी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. चांगल्या पावसाअभावी सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही चारा छावणीचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसते. औरंगाबाद तालुक्यात एक चारा छावणी सुरु असून त्यात ९२१ जनावरे दाखल आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एक चारा छावणीत २२३, बीड तालुक्यातील एका चारा छावणीत ६४६, आष्टी तालुक्यात ३ चारा छावण्यात २२७९, वडवणी तालुक्यातील एक चारा छावणीत ८५५ तर गेवराई तालुक्यात सहा चारा छावण्या सुरू असून त्यात ४५५७ जनावरे दाखल आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात २२ चारा छावण्या सुरू असून त्यात १३२५९ परंडा तालुक्यात सतरा चारा छावण्या ११८०६, वाशी तालुक्यात दोन चारा छावण्यांमध्ये १७७५ जनावरे दाखल आहेत. दुसरीकडे मराठवाड्यात टँकरची संख्याही कमी व्हायला तयार नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ६८९ पाणी टँकर सुरू आहेत. बीड जिल्ह्यात ६३२, जालना ३६०, उस्मानाबाद २२९, लातूर १०४, नांदेड १३४, परभणी ६८ तर हिंगोली जिल्ह्यात ५० पाणी टँकर सुरू आहेत. अशा प्रकारे मराठवाड्यात अजूनही २२६३ पाणी टँकर सुरू आहेत.

 चांगल्या पावसाची अपेक्षा 
औरंगाबाद -जालना, बीड या तीन जिल्ह्यांमध्ये  सरासरी ७० टक्के पाऊस पडला असला तरी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे निम्म्याहून अधिक मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.