पाण्यासाठी सिडकोत भाजप नगरसेवकांचे आंदोलन !

Foto


औरंगाबाद  : गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीप्रश्‍न सातत्याने पेटत चालला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पाणीप्रश्‍नावरून नागरिकांत संतापाची भावना पसरली आहे. सिडको, हडको भागात तर परिस्थिती अत्यंत गंभीर असून, नऊ दिवसानंतरही पाणी न मिळाल्याने आज शनिवारी भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत, नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी नागरिकांसह सिडको एन-5 येथील जलकुंभ गाठत आंदोलन केले. आ.अतुल सावे यांनी जलकुंभावर जाऊन आंदोलनकर्त्यांची समजूत घातली.शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. 

जायकवाडी धरणातील पाणीसाठा घटल्याने शहराला होणार्‍या पाणीपुरवठ्यात घट झाली आहे. दुसरीकडे आहे त्या पाण्याचे नियोजन करण्यातही महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे. कुठे तीन दिवसाआड तर काही वसाहतींमध्ये सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यातही सिडको, हडको भागात परिस्थिती अतिशय गंभीर झालेली दिसून येते. सिडको एन-4,एन-3 मध्ये सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आज शनिवारी एन-4 परिसरात नऊ दिवसानंतर मनपा प्रशासनाच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे या वॉर्डाच्या भाजप नगरसेविका माधुरी अदवंत यांनी सकाळी सात वाजेपासून नागरिकांसह थेट एन-5 जलकुंभ गाठत आंदोलन सुरू केले. यावेळी भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे, उषा काळे, आशा वानखेडे, स्मिता रायबोले, स्मिता कुलकर्णी, रेखा पाटील, प्रकाश साखरे, नंदकिशोर ठाकूर, संजय भट्ट, भाऊसाहेब तांदळे, जे.बी.जगताप आदींसह मनपा पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

अधिकारी पैसे घेऊन पाणी विकतात....
अधिकारी इतरांकडून पैसे घेऊन पाणी विकतात, आमच्याकडून त्यांना काही मिळत नाही म्हणून आमची अडचण होते, असा आरोप नगरसेविका माधुरी अदवंत यांनी यावेळी केला. पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवरून सिडको एन-3, एन-4 परिसराला वाहिनी जोडून पाणी देण्याचे काम सुरू करावे व या भागात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावा. सदर काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजनगर येथील महिलाही जलकुंभावर!
सिडको एन-5 येथील जलकुंभाच्या ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाची माहिती राजनगर परिसरात पोहोचली आणि टँकर मिळत नसल्याने तेथील महिला व पुरुषदेखील थेट जलकुंभावर दाखल झाले. आंदोलन करताना अधिकार्‍यांना न बोलता केवळ टँकरचालकांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत टँकरचालक जलकुंभावरून बाहेर पडले. सकाळपासून जलकुंभावर आंदोलन सुरू असताना मनपातील एकही वरिष्ठ पदाधिकारी आंदोलनस्थळी हे वृत्त देईपर्यंत फिरकलेले नव्हता.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker