अन्यथा तुमचा खैरे होईल! तर रावसाहेब दानवे यांची स्टाईल लय भारीच; भाजप नेते- पदाधिकार्‍यांना बागडे नानांनी पाजले उपदेशाचे डोस!

Foto
औरंगाबाद: गेल्या आठवड्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना यांनी भाजप भाजप नेते -कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांना उपदेशाचे चांगलेच डोस पाजले. रात्र थोडी सोंगे फार असल्याने दिवस-रात्र काम करा अन्यथा तुमचा खैरे व्हायला वेळ लागणार नाही असा सूचक इशाराच नानांनी दिला. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खुमासदार शैलीत कार्यकर्त्यांचे कान टोचले. निमित्त होते एका पदग्रहण सोहळ्याचे !

या सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने आम्ही कार्यकर्त्यांना सन्मान देतो याची चुणूक दाखवून दिली. दानवे यांच्या दाव्यानुसार जिल्ह्यातील १० कार्यकर्त्यांना मानाची पदे मिळाली आहेत. दुसर्‍या कोणत्याच पक्षाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची सोय केलेली नाही. केंद्रात दुसर्‍यांदा भाजप सत्तेवर आल्यानंतर दिल्लीत वातावरण एकदम टाईट आहे. सकाळी साडेनऊ वाजता ऑफिस मध्ये हजर व्हावे लागते. मोदींच्या नेतृत्वात काम करणे सोपे नाही. कार्यकर्ते -पदाधिकार्‍यांनी ही बाब समजून घेतली पाहिजे, असा सल्ला दानवे यांनी दिला. दानवे यांच्या खुमासदार शैलीने कार्यकर्त्यांना पोट धरून हसविले. बागडे नानांनी मात्र सर्वांचीच शाळा घेतली. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, अशावेळी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवून त्यांना दिलासा दिला नाही तर विमान जमिनीवर येण्याला वेळ लागणार नाही. असा इशाराच नानांनी दिला. 2022 पर्यंत सर्वसामान्यांना घरे देण्याचे स्वप्न पंतप्रधानांचे आहे. अशा वेळी शहरातील गुंठेवारी सह सिडको-हडको चा प्रश्न तातडीने निकाली काढावा लागेल. कामगार, बेरोजगार, महिला विद्यार्थी या सर्वांचेच प्रश्न तितक्याच ताकतीने सोडवण्यासाठी काम करण्याचे आवाहन नानांनी केले. पदे मिळाली म्हणून हवेत राहण्याचे दिवस आता नाहीत, पदा सोबत आलेली जबाबदारी निभावावीविच लागेल असाही सल्ला नानांनी दिला.

खैरे यांचे उदाहरण 
सर्वसामान्यांपासून नाळ तोडली की काय होते याचे उदाहरणच नानांनी दिले. विधानसभेचे आव्हान मोठे आहे. सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन काम करावे लागेल नसता तुमचा खैरे व्हायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.

धास्ती वंचित आघाडीची
दरम्यान, जिल्ह्यात वंचित आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. भाजपनेही वंचित आघाडीची धास्ती घेतल्याचे दिसते. पूर्व मतदारसंघात तसेच पश्चिम सह इतर काही मतदारसंघात वंचितचे आव्हान मोठे आहे. अशावेळी नेत्यांनी तसेच पदाधिकार्‍यांनी वेळीच सावध होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker