निवडणुकीच्या तोंडावर भाजपात जुने नवे आमने सामने
सांजवार्ता ऑनलाईन Feb 08, 2020
पक्ष बैठकांतून तनवाणी गायब !
औरंगाबाद
शहर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणताही वाद नसल्याचे भाजप नेते सांगत असले तरी माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला अजूनही यश आलेले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या मंडळ निहाय बैठकांना तनवाणी यांची अनुपस्थिती पक्षातील बेबनाव दाखवून देते. ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात जुने -नवे असा वाद उफाळून आला आहे.
दोन आठवड्यापूर्वी भाजप शहराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा या पदासाठी जोर लावला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर ठाण मांडून महानगरपालिका निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. शहराध्यक्ष पदाची माळ अखेर संजय केनेकर यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासून तनवाणी नाराज आहेत. पक्षाने मात्र तनवाणी नाराज नसल्याचे वारंवार स्पष्ट केले होते. खुद्द केनेकर यांनीच तनवाणी यांची भेट घेत शुभेच्छा स्वीकारल्या. अन पक्ष एकसंघ असल्याचा दावा केला. मात्र पक्षाच्या बैठकांतून तनवाणी गायब असल्याने चर्चा सुरू झाली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गेल्या आठवडाभरापासून मंडळनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले आहे. गारखेडा, सिडको-हडको मंडळांच्या बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांना आ. अतुल सावे, शहर अध्यक्ष संजय केनेकर, डॉ.भागवत कराड, भाई ज्ञानोबा मुंडे यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी हजर होते. माजी शहर अध्यक्ष किशनचंद तनवाणी मात्र अनुपस्थित होते.
उफाळला जुने -नवे वाद
दरम्यान शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर पक्षात पुन्हा जवेन नवे-जुने असा वाद फळयाचे दिसते. शहराध्यक्षपदावरून तनवाणी पाय उतर झाल्यानंतर माजी शहराध्यक्ष तनवाणी पक्षाच्या कार्यक्रमात फारसे सक्रिय नाहीत. महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय प्रक्रियेतही तनवाणी कुठेही दिसून येत नसल्याने पक्षात पुन्हा जुने-नवे असा वाद उफाळून आल्याचे बोलले जाते.
संघ दक्ष !
शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्याला फारकत देत काँग्रेससोबत युती केल्याने भाजपला आता शहरात यश मिळेल अशी आशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. त्यामुळे संघाचे कार्यकर्ते या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. दुसरीकडे युती तुटल्यानंतर आता जुन्या भाजप कार्यकर्त्यांनाही राजकीय धुमारे फुटले आहेत. जुन्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पक्ष सावध झाला आहे. आतापर्यंत जुन्या कार्यकर्त्यांना पक्षाने डावलले असा सूर नेत्यांच्या बैठकांतून निघतो आहे. तनवाणी गट त्यामुळेच नाराज असल्याचे बोलले जाते. संघानेही मनपा निवडणुकीच्या व्युव्हरचनेत लक्ष घातल्याने जुन्यांना अच्छे दिन येणार यात शंका नाही.