राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला !

Foto

नवी दिल्‍ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्‍लीत आज काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देेण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडला. मात्र त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती करत  कार्यकारिणी सदस्यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पक्षाध्यक्षा तथा संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा आणि काँग्रेसचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.लोकसभा निवडणुकीत एकूण 542 पैकी काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 2014 नंतर लागोपाठ दुसर्‍यांदा दारूण पराभवाचा सामना करावा लागला. राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. यावेळी लोकसभा निवडणुकीत 19 राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असले तरी मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. उत्तर प्रदेशच्या 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सतत अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव कार्यकारिणी बैठकीत मांडला पण कार्यकारिणी सदस्यांनी तो फेटाळला. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजबब्बर, अमेठीचे जिल्हाध्यक्ष तसेच कर्नाटक प्रचार व्यवस्थापक, ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष आदींनी राजीनामे दिले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील राजीनामा देणार असल्याचे समजते. या सर्व मुद्द्यांवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय कर्नाटक, मध्य प्रदेशमधील राज्य सरकार टिकवण्याच्या आव्हानांवरही चर्चा झाली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker