पोलिसांच्या कडक बंदोबस्तात बारावीच्या परीक्षेस सुरुवात

Foto
औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने (दि.१८) आजपासून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात बारावी बोर्डाच्या परीक्षेस सुरूवात झाली. बारावीच्या परीक्षेला विभागातून १ लाख ७१ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पहिल्याच दिवशी भरारी पथकांनीही सर्व केंद्रावर लक्ष केंद्रित केलेले दिसून आले.

गेले एक महिन्यापासून बोर्डाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. बारावी परीक्षेला औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली असे एकूण १ लाख ७१ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. त्यात १ लाख ६ हजार १४१ मुले तर ६५ हजार ८१८ मुलींचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण १४२ परीक्षा केंद्रावर ६२ हजार ७१२ विद्यार्थी तर बीड जिल्ह्यातील ९७ परीक्षा केंद्रावर ४० हजार ६५१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. जालना जिल्यातून ७३ परीक्षा केंद्रावर जिल्यातील ३० हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. याशिवाय परभणी जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रावर २४ हजार ४५४ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. याशिवाय हिंगोली जिल्यातून ३३ परीक्षा केंद्रावर १३ हजार २४८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर परीक्षेस सुरुवात झाली.

परीक्षा मुलांची पण, ताण पालकांना
आज परीक्षा सुरू होताच समुपदेशकांचे फोन खनानले. कालपासून बोर्डाच्या वतीने दिलेल्या हेल्पलाईन वर पालक, विद्यार्थी फोन करून आपल्या शंका विचारत आहेत. त्यात सर्वाधिक फोन पालकांनी केले आहेत. काल रात्रीपासून ते आज दुपारपर्यंत ३० पेक्षा अधिक विद्यार्थी, पालकांनी समुपदेशकाना फोन केले. त्यामध्ये 'सर माझा अभ्यास झाला आहे पण लक्षात राहत नाही मी काय करू?' , तसेच जास्त मार्क्स मिळविण्यासाठी काय करू? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी समुपदेशकाना विचारले असल्याचे समुपदेशक शशिमोहन शिरसाठ यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.

पोलिस दिसताच काहींनी फेकल्या कॉपी
पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आज बारावीच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता पेपर सुरू झाला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेरच पोलिसांना बघताच कॉपी बाहेर फेकल्या. यावेळी उपद्रवी केंद्रावर कडक बंदोबस्त दिसून आला. याशिवाय विद्यार्थ्यांना चप्पल, बूट देखील बाहेर काढण्यात सांगितले. तसेच मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक साधन बाहेर ठेवण्यात आली.

सूचनांचे पालन न केल्याने विद्यार्थ्यांची झाली धावपळ
बारावी परीक्षेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी गोंधळ दिसून आला. बोर्डाच्या वतीने सूचना देऊनही काही विद्यार्थ्यांनी सुचनाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना ट्रान्स्फरंट पॅडच आणावेत असे सांगण्यात आले होते. परंतु काही विद्यार्थ्यांनी पुठ्याचे पॅड आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ झाली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker