महावितरणच्या कारभाराचे पितळ पडले उघडे; वादळीवारा-पावसामुळे शहर अंधारात

Foto

औरंगाबाद: मृग नक्षत्राच्या दुसर्‍या दिवशी शहरात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने महावितरणचे पितळ उघडले पडले आहे. महावितरणने मान्सूनपूर्व कामे केल्याचा दावा खोटा ठरला आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला. सायंकाळी ४ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्री उशिरापर्यंत नागरिकांना अंधारात राहावे लागले. तर कंपनीकडून रात्री दिड वाजेपर्यंत विजेच्या तारांची जोडणी व उपकेंद्रांतील दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचा दावा प्रशासनाने केले आहे. 

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरण कंपनीकडून विजेच्या तारा तसेच विद्युत डीपी जवळील वृक्षाच्या फांद्या तोडण्याचे काम केले जाते. पण दि. ७ जून आणि ९ जून रोजी शहरात आणि जिल्ह्यात सर्वत्र वादळवार्‍यासह पावसाचे जोरदार आगमन झाले. वादळवार्‍यामुळे शहरात जवळपास २० ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. ही वृक्ष विजेच्या तारांवर कोसळल्याने अनेक ठिकाणी तारा तुटल्या तर हर्सूल, चिकलठाणा मार्गावर १३२ के.व्ही.ची मुख्य वीज पुरवठ्याची आर्थिंग वायर तुटली. त्यामुळे ५ उपकेंद्र बंद पडली.  चिकलठाणा, सिडको, नारेगाव, हर्सूल, हिमायत बाग, भगतसिंगनगर, सिडको, हडकोचा वीज पुरवठा खंडित झाला. शहागंज, सिटीचौक, कटकटगेट, बस स्थानक, निराला बाजार, पानचक्‍की, विद्यापीठ परिसर, सातारा, देवळाई, रेल्वे स्टेशन, उस्मानपुरा, समर्थनगर, औरंगपुरा, गुलमंडी, मिल कॉर्नर, महावीर चौक, वाळूज, पंढरपूर, रांजणगाव, वडगाव आदी भागातील वीजपुरवठा  खंडित झाला. वाळूजमधील 2 फिडर, गारखेड्यातील 3 फिडर, चिकलठाणा परिसरातील ५ व अन्य १५ ठिकाणचे फिडर बंद पडले. याचा फटका उद्योगासह नागरिकांना बसला. त्यामुळे उद्योगांचे मोठे नुकसान झाले. पाऊस थांबल्यानंतर महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. रात्री ८.३० वाजेपर्यंत काही भागातील वीजपुरवठा सुरळीत केला तर हिमायतबाग परिसरातील उपकेंद्राची दुरुस्ती रात्री दीड वाजेपर्यंत करण्यात आली असल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले. महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या नसत्या. या फांद्यांमुळे यापुढेही विद्युत तारा तुटून वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनी फांद्या तोडल्याचा दावा करते याचा अर्थ कंत्राटदारांना कागदोपत्री झाडाच्या फांद्या तोडून बिले उचलली का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी होत आहे. 

शहराची माहिती असूनही दुर्लक्ष
महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे गेल्या तीन वर्षांपासून येथे कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांत पाऊस आणि वादळामुळे विद्युत ताराजवळील वृक्षतोड करावी लागणार आहे, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेल्या उपकेंद्रातील फिडरची दुरूस्ती करावयाची आहे. याची सर्व माहिती असतानाही गणेशकर यांनी मान्सूनपूर्व करावयाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यानेच रविवारी शहर अंधारात गेले असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते. 

वृक्ष आणि फ्लेक्समुळे वीज पुरवठा खंडित
शहरात दोन दिवस वादळी वार्‍यासह पाऊस पडला. वादळामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर वृक्ष कोसळले. तसेच शहरात लावलेल्या मोठ्या फ्लेक्सचे रेग्जीन तारांवर पडल्याने शार्टसर्कीट होऊन तारा तुटल्या. त्यामुळे शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला. प्रशासनाच्या वतीने शहरातील विजेच्या तारांजवळील फांद्या तोडण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी राहिल्या असतील तर त्या काढल्या जातील. आम्ही महानगरपालिकेला पत्र पाठवून शहरात सर्व रस्त्यावर व इमारतीवर लावलेल्या होडिंग्जवरील फ्लेक्स काढण्याची विनंती केली. पण मनपाने ते काढले नाहीत. वादळात रेग्जीनचे तुकडे विद्युत तारांवर पडल्याने स्पार्क होऊन विद्युत तारा तुटल्या. महावितरणच्या सर्व कर्मचार्‍यांनी रात्री उशिरापर्यंत काम करून विद्युत पुरवठा सुरळीत केला. काही ठिकाणी किरकोळ दुरुस्त्या केल्या जात आहेत पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कंपनीकडून खबरदारी घेतली जात आहे. 
सुरेश गणेशकर, 
मुख्य अभियंता, महावितरण