पडद्यामागील दिग्दर्शकाने रंगविले; मनपातील गोंधळी नाट्य !

Foto
औरंगाबाद : क्षणाक्षणाला बदलणारे पात्र... बोलले जाणारे डायलॉग...अन पडद्यामागील दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून केलेला उत्तम अभिनय !  असा तब्बल तीन तासांचा थरारक शो काल महानगरपालिकेत पाहायला मिळाला. जुने अन मुरलेले नट,  नव्यानेच या क्षेत्रात आलेले अशा जुन्या-नव्या रंगकर्मीची जुगलबंदी, घोषणाबाजी अन हास्यांचे फवारे सर्वच  नाटकीय !  मात्र हेच जर वास्तव मानत असू तर आपण कुठेतरी चुकतोय, असेच म्हणावे लागेल. 

शहराच्या भविष्याची दोरी विश्वासाने ज्यांच्या हातात दिली. तेच जर ’बोलक्या बाहुल्या’ सारखा खेळ करत असतील तर शहराचे काही खरे नाही म्हणून समजा ! 
खरेतर कालच्या चित्रपटाने कोण हरले, कोण जिंकले याची चर्चा झालीच नाही. मात्र हा सगळा प्रकार सभागहाबाहेर पोहोचेल याची दक्षता ज्या पद्धतीने घेण्यात आली त्यावरून या चित्रपटाची पटकथा आधीच तर लिहिली गेली नव्हती ना, अशी शंका येते. एमआयएम ला कोण नमवते, याची स्पर्धाच जणू सेना-भाजपात लागली होती.   पहिल्या अर्ध्या तासात भाजप सदस्य आक्रमक होत असल्याचे दिसताच एमआयएम सदस्यांनी सभागृहात धाव घेतली. बाहेरच्या दिग्दर्शकाने सूचना दिल्यानुसार त्यांनी मग चित्रपटाचे कथानक पुढे लांबविले.  सामना एमआयएम भाजपामध्ये रंगणार याची कुणकुण लागताच शिवसेनेचे दिग्दर्शक सजग झाले. एमआयएमला आम्हीच रोखले, असा गाजावाजा भाजप करेल असे सेनेच्या लक्षात येताच सैनिक सरसावले. तोपर्यंत अर्धा चित्रपट संपला होता.

सरिता बोर्डेचा प्रखर विरोध
 वंचित आघाडीच्या नवख्या विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी भाजप-सेनेला जेरीस आणले. त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरली.  बोर्डे यांच्या प्रखर विरोधापुढे एकवेळ महापौर नंदकुमार घोडेले अक्षरशः हतबल झाले होते. महापौर घोडेले उठून जात असताना बोर्डे आणि महिला सदस्यांनी त्यांना  आसनावरच घेराव घातला. आता सेनेवरच बाजू उलटते की काय, असे वाटू लागले. तेव्हा महापौरांनी कट... कट...कट म्हणत सभागृहाचे कामकाज थांबविले अन् सभागृहातून ते बाहेर पडले. भाजपचे बापू घडामोडे, प्रमोद राठोड, राज वानखेडे, राजू शिंदे, नितीन चित्ते, शिवाजी दांडगे या मातब्बर शिलेदारांनी मोदींच्या नावाचा घोषा लावत एमआयएमला प्रत्युत्तर दिले.

महापौर आक्रमक
 दुपारी साडे बारानंतर महापौर अचानक अ‍ॅक्शनमध्ये आले. त्यांनी एमआयएमच्या पाच एमआयएमच्या नगरसेवकांना निलंबित करीत सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.  महापौरांचा बदललेला नूर सर्वांनाच आश्‍चर्यचकित करून गेला. पडद्यामागच्या सूत्रधारांनी एमआयएमच्या नगरसेवकांना ठिय्या आंदोलन सुरू करण्याची सूचना केली. अन् बरहुकूम 20 नगरसेवकांनी महापौरांच्या खुर्चीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौर आक्रमक झाल्यानंतर तासाभराने सेनेचे सदस्य महापौर जिंदाबादच्या घोषणा देऊ लागले. आतापर्यंत एमआयएम-भाजप असा सामना महापौर विरुद्ध एमआयएम असा सुरू झाला. त्यानंतर अखेरपर्यंत भाजपा फोकसमध्ये आलीच नाही. शेवटपर्यंत महापौर मुर्दाबाद आणि महापौर जिंदाबाद याच घोषणा ऐकायला मिळाल्या.