प्रमुख राजकीय पक्षांतील नाराजही ‘वंचित’च्या तंबूत; नाराज छोट्या समाजघटकांना आपल्याकडे वळवण्यात वंचित आघाडी यशस्वी

Foto
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने सरकार विरोधातील नाराजी कॅश करण्याचा यशस्वी प्रयत्न चालविला आहे. विशेषतः मुस्लिम, धनगर बंजारा यासह ओबीसीमधील अनेक छोटे समाजघटक वंचित बहुजन आघाडीच्या तंबूत जात असल्याने भाजप, शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीलाही मोठा फटका बसणार, असे बोलले जाते. काल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मेळाव्याला झालेली गर्दी वंचित बहुजन आघाडीचे मनोबल वाढविणारी ठरली. यावेळी अनेक पक्षातील पदाधिकार्‍यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीनंतर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर काल पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात आले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात एकमेव उमेदवार निवडून देणार्‍या शहरात अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काल दिवसभर वेगवेगळ्या समाजघटकांसोबत चर्चा केली. विशेषतः धनगर आणि बंजारा समाजातील मातब्बर नेते यावेळी आंबेडकरांसोबत असल्याचे दिसून आले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार असलेले अनेक समाजघटक आज आंबेडकरांसोबत आहेत. एमआयएमसोबत युती केल्याने वंचित बहुजन आघाडीचे बळ वाढले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या नाराजांची फौजच बाहेर पडत आहे. याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने चालवला आहे. जिल्ह्यातील अनेक नेते अ‍ॅड.आंबेडकर यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्‍चिम या तीन मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी मोठी स्पर्धा आहे. त्याचबरोबर फुलंब्री, पैठण, गंगापूर या मतदारसंघांवरही वंचित बहुजन आघाडी बारीक लक्ष ठेवून आहे. 

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि सेनेची मातब्बर मंडळी वंचित बहुजन आघाडीच्या तंबूत शिरण्याची शक्यता आहे. गंगापूर मधूनही काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नाराज मंडळी उमेदवारीच्या अपेक्षेने वंचितच्या तंबू जाऊ शकते, असे बोलले जाते. औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदारसंघावर एमआयएमने तर पश्‍चिम मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून प्रमुख पक्षाने नाकारलेले नेते वंचित आघाडीच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता आहे.

 कालच्या बैठकीतही औरंगाबाद (पश्‍चिम) मतदारसंघावर गंभीर चर्चा करण्यात आली. अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक अमित भुईगळ यांनी आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांशी चर्चा केल्याचे समजते, तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छुकांनीही बाळासाहेबांकडे निरोप धाडल्याचे समजते. पूर्व आणि मध्य मतदारसंघावर एमआयएमचा दावा प्रबळ आहे. मात्र, पश्‍चिम मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीसाठी सुटेल, असे काही नेते सांगतात. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातही वंचित आघाडीने चाचपणी सुरू केली आहे.

छोट्या समाजघटकांना साद
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या औरंगाबाद दौर्‍यात छोट्या समाजघटकांना साद घातली. प्रमुख राजकीय पक्ष तुम्हाला न्याय देऊ शकत नसेल, तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा संदेश देत त्यांनी या पक्षांचे पारंपरिक मतदार आपल्याकडे वळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.