बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या

Foto

औरंगाबाद : रोजगार मिळविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून औरंगाबादला आलेल्या बेरोजगार युवकाने रोजगार मिळत नसल्याने मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी रामनगर सिडको येथे उघडकीस आली. 

याबाबतची माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील मनाड येथील किर्तीशिल भगवान रणवीर(२३) हा युवक दोन महिन्यांपूर्वी रोजगाराच्या शोधार्थ रामनगर येथे राहणारे त्याचे मामा सूर्यकांत बगाटे यांच्याकडे  राहण्यास आला. गेले दोन महिन्यांपासून तो रोजगार मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी गेला. पण त्यास रोजगार मिळाली नाही. त्यामुळे किर्तीशिल रणवीर या युवकाने आज मामाच्या घरात गळफास घेतला. किर्तीशिलची मामी सकाळी मुलीला शाळेत सोडविण्यासाठी गेली होती. शाळेत मुलीला सोडून आल्यावर रणवीर राहत असलेल्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्यामुळे त्यांनी त्यास उठविण्यासाठी दार ठोठावले. पण वारंवार दार वाजवूनही दार न उघडल्याने त्यांनी शेजार्‍यांना बोलावले. शेजार्‍यांनी ही आवाज दिला. पण आतून आवाज न आल्याने अखेर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी किर्तीशील याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. पोलिसांनी किर्तीशील यास खाली काढले व पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून किर्तीशील रणवीर यास मृत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.