वाळू माफियांच्या हल्ल्यात गंभीर जखमी नायब तहसीलदाराची आपबिती...ते दोघे देवदूतच, त्यांनीच मला जमावाच्या हल्ल्यातून वाचविले!

Foto

औरंगाबाद- वैजापूर तालुक्यातील मांडकी शिवारात अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या नायब तहसीलदार रमेश भालेराव यांनी जीवन-मरणाचा अनुभव याची देही याची डोळा पाहिला. शंभर ते दीडशे लोकांचा जमाव दगडांचा वर्षाव करताना ते दोघे देवदूतासारखे धावून आले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भालेराव यांना दुचाकीवर बसवत रुमालाने त्यांचे डोके झाकले अन सुसाट वेगाने दुचाकी गावाबाहेर काढली. त्या दोघांच्या या समयसूचकतेमुळे आज मी जिवंत असल्याची भावना रुग्णालयात उपचार घेत असलेले भालेराव व्यक्त करतात.

 

वैजापूर तालुक्यातील मांडकी येथे बेकायदा वाळू उपशाची माहिती मिळाल्यावर नायब तहसीलदार रमेश भालेराव यांच्यासह तलाठी म्हस्के, सचिन गायकवाड आणि जाधव यांच्या पथकाने सायंकाळी पाचच्या सुमारास वैजापूरहून मांडकी कडे कूच केली. दीड तासाच्या प्रवासानंतर साडेसहाच्या सुमारास हे पथक इच्छित स्थळी पोहोचले. तेथे ट्रक आणि ट्रॅक्टर मध्ये वाळू भरल्या जात होती. महसूल पथक आल्याचे लक्षात येताच वाळू भरण्याचे काम तातडीने थांबविण्यात आले. पथकाने वाहन जप्त करण्याची कारवाई सुरू केली तेवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या काहींनी फोनाफोनी करून जमावाला बोलविले. महसूल पथकाला याची कल्पना आली नाही. अवघ्या काही मिनिटातच शंभरावर लोक त्या ठिकाणी गोळा झाले. या जमावाने प्रारंभी महसूल पथकाशी बाचाबाची सुरु केली तर काहींनी दगड उचलून पथकावर भिरकवण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेने पथकातील चार-पाच जण विखुरले गेले. रस्ता मिळेल तिकडे ते पळत सुटले. जमावही  आक्रमक होऊन त्यांच्यावर हल्ला करू लागला. आता आपली काही खैर नाही, असा विचार करून अंधारात एका आडोश्याला भालेराव लपले. तरीही काहींनी शोधून भालेराव यांच्यावर जबर हल्ला चढवला.  त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले तर जबर मुका मार बसला.आता जमावापुढे आपली खैर नाही. या विचाराने भालेराव किंचाळत पळू लागले. तेवढ्यात त्या दोघांनी भालेरावांना गाठले आणि उचलून आपल्या दुचाकीवर बसविले. काही कळण्याच्या आतच भालेराव एका सुरक्षित हातात होते. त्या दोघांनी भन्नाट वेगाने दुचाकी जमावातून गावा बाहेर काढली. आणि लासुर स्टेशन कडे बेफाम चालविली. भालेराव यांना प्रचंड वेदना होत होत्या. भेदरलेल्य भालेराव यांना त्यांनी धीर दिला. भालेराव यांनी या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांना दिली. त्यांनी तातडीने देवगाव रंगारी पोलिसांना कळविले .दीड तासाने पोलिसांचा ताफा गावात पोहोचला आणि जमावातील पाच जणांना अटक करण्यात आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महसूल संघटना कारवाई करण्यासाठी पोलिसांचे संरक्षण द्यावे अशी मागणी संघटनेने केली होती. मात्र पथकाला पोलिस संरक्षण दिले जात नाही. त्याचाच परिणाम म्हणून कालच्या घटनेत पाच महसूल कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात आला होता. जिल्हाधिकारी आणि पोलीस संरक्षण रक्षणासाठी पाठवावी अशी मागणी संघटना करीत आहे.

 

मरण पाहिले म्या डोळा

 

बेकायदा वाळू वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या भालेराव यांनी आपण वाचलो ही परमेश्वराची कृपा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हल्ला होत असताना आता आपल्या जीव वाचू शकत नाही असे क्षणभर जाणवल्याने मूर्छित पडण्याची वेळ आली होती. मात्र या बेफाम दगडफेकीत ते दोघे देवदूतासारखे धावून आले... मला दुचाकीवर बसवत भन्नाट वेगाने त्यांनी गावाबाहेरचा मार्ग पकडला. त्यामुळेच माझा जीव वाचू शकला, असे भालेराव यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.

 

वैजापूर तालुक्यात काम बंद

 

वाळूमाफियांच्या हल्ल्याने संतप्त महसूल कर्मचार्‍यांनी आज वैजापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळला. कर्मचार्‍यांनी काम बंद केल्याने प्रशासन ठप्प झाले आहे. या वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, आरोपींना जबर शिक्षा द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. दोन दिवसात आरोपींना अटक केली नाही तर बुधवारपासून जिल्हाभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरी यांनी दिला.

 

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker