एक विचार एक झेंडा एक मंच... हेव्यादाव्यांमुळे दलित एैक्याची आशा मावळली

Foto

औरंगाबाद-  दलित समाजातील  संघटनांचे एैक्य व्हावे या दृष्टीने शहरातील सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रीत करण्यासाठी एकविचार एकमंच हा मंत्र घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारदिनी गतवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास जनतेने उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. पण आपसातील मतभेद, अहंकार आणि मी पणा नेत्यांमध्ये भरलेला असल्याने दलित एैक्य करण्याचा युवकांचा उत्साह मावळला आहे.


गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात देशात सत्तांतर झाल्यानंतर राज्य घटना बदलण्याचा घाट काही शक्‍तींनी सुरू केला. त्याबाबत सत्ताधारी आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी वेळोवेळी, राज्य घटना आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बद करण्याबाबत वक्‍तव्ये केली. त्यामुळे दलित समाज एकत्रित केला पाहिजे. त्यासाठी शहरातील विविध संघटनांमध्ये काम करणार्‍या युवकांनी व विद्यार्थी नेत्यांनी  एक विचार एक झेंडा, एक मंच उभारून सर्व नेत्यांना एका मंचावर आणण्याचा निर्णय घेतला.


युवकांच्या या आवाहनाला रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर वगळता सर्व नेत्यांनी हजेरी लावली. यानिमित्ताने दलित संघटनांचे एैक्याचे वारे सुरू झाले. जनतेमध्येही दलित एैक्याबाबत आनुकूल चर्चा सुरू झाली. पण दलित एैक्य करू इच्छिणार्‍या या युवकांना मात्र नामविस्तार दिनानंतर नेत्यांचे अनुभव येऊ लागले. जतनेच्या रेट्यामुळे एकत्रित आलेले नेते मात्र प्रत्यक्षात एकमेकांच्या तोंडाकडे पाहू इच्छित नाही. दलित चळवळ सोडून इतर समाजातील नेत्यांना जवळ करणारे नेते मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन आपली स्वतंत्र दुकाने चालविण्यातच धन्यता मानतात. हे एैक्यवादी युवकांना कळून चुकले. युवा पिढी समाजाला दिशा देऊ शकते, असा इतिहास आहे. पण दलित युवकांना मात्र दलित नेत्यांचे एैक्याबाबतचे विचार व अनास्था पाहून यावर्षी एक विचार एक मंच, एक झेंडा हा विचार सोडून द्यावा लागला.


आज देशात दलित समाजाबाबत कोणत्याही राजकीय पक्षाला देणे घेणे नाही.  पत्येकजण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानणारे आम्हीच आहोत असे म्हणून दलित समाजाचा फक्‍त व्होट बँकेसाठी वापर करून घेत आहेत. अशा स्थितीत युवकांनी आशावादी राहत एैक्यासाठी नव्हे तर समाजासाठी एकत्रीत राहणे काळाची गरज आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker