राष्ट्रवादी काँग्रेसला कन्नड मधून जोरदार धक्का, हर्षवधन जाधवांना शह देण्यासाठी खैरेंची खेळी

Foto

औरंगाबाद- कन्नड विधानसभा मतदारसंघ आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे चांगलाच चर्चेत असतो जाधव यांना लोकसभा लढवण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकात तालुक्यातील सर्वच नेत्यांना आमदारकीचे वेध लागले आहे. त्यातच कन्नड तालुक्यातील तुल्यबळ समजल्या जाणारे नेते उदयसिंह राजपूत यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली आहे.

निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पक्षातील नेते त्या पक्षात जाऊ लागले आहेत. तर काही नेते घरवापसी करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील नेहमीच चर्चेत असणारे कन्नड तालुक्यातील आमदार हर्षवर्धन जाधव यांना शह देण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खेळी खेळत शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या आश्रयाला गेलेले नेते उदयसिंह राजपूत यांची घरवापसी केली आहे. आज ( रविवारी ) त्यांचा शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश खा. खैरे यांच्या नेतृत्वाखाली झाला असून त्यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेना पक्षाला कन्नड तालुक्यातील आपली पकड मजबूत करता येणार आहे. उदयसिंह राजपूत यांनी या आधी देखील त्यांनी विधानसभे साठी आपले नशीब आजमावून पाहिले आहे पण केवळ १ ते २ हजाराच्या फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली आणि शिवसेना कन्नड तालुक्यात बॅकफूट वर गेली होती. मात्र उदयसिंह राजपूत यांच्या घरवापसीने शिवसेना तालुक्यात मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उदयसिंह राजपूत शिवसेनेचे उमेदवार असतील का असे चंद्रकांत खैरे यांना विचारले असता ते म्हणाले की उमेदवार म्हणून कोणाचेही नाव घोषित करता येत नसते. पण त्यांच्या घरवापसीने शिवसेना कन्नड विधानसभा जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खैरे पुढे म्हणाले की उदयसिंह राजपूत आमचाच होता आणि आता तो आमचाच असणार आहे.