सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचे पालन केले पाहिजे आणि मदत केलीच पाहिजे, असे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांसाठी हा मोठा झटका मानण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला संविधान बेंचमध्ये आव्हान देखील देऊ शकते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्याचे कुटुंबीय त्याचप्रमाणे चाहत्याकडून ही मागणी वारंवार होत होती. ’सत्याचा विजय होतो’ असे ट्वीट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केले आहे. त्याचप्रमाणे सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने या निर्णयानंतर देवाचे आभार मानले आहेत, ’सत्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. सीबीआयवर पूर्ण विश्वास आहे’, असे ट्वीट श्वेताने केले आहे. याप्रकऱणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. सुनावणी करणरे न्यायाधीश ऋषिकेश रॉय यांनी सर्व पक्षांचे युक्तिवाद संक्षिप्त लिखित नोट स्वरूपात 13 ऑगस्टपर्यंत जमा करण्यास परवानगी दिली होती. सर्व पक्षांनी 13 ऑगस्टपर्यंत जबाब दाखल केला होता. ज्यावर न्यायालयाने आज निर्णय दिला आहे.
’सत्यमेव जयते’ ः पार्थ पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार्या पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले आहे. ’सत्यमेव जयते’, असे सूचक ट्वीट पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनीरित्या फटकारल्यानंतरही पार्थ पवार याप्रकरणी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहेत.