रिझर्व्ह बँकेने जाहीर केले पत धोरण
आज गुरुवारी ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आले. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले होते. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने रेपो रेट आहे तसाच म्हणजे 4 टक्के इतका ठेवला आहे. तर रिझर्व्ह रेपो रेट देखील आहे तितकाच 3.3 टक्के इतका ठेवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात 1.15 टक्के इतकी कपात केली होती. करोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी आणि लॉकडाउनचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. यापूर्वी पतधोरण आढाव्याची बैठक मार्च आणि मे महिन्यात झाली होती. त्यामध्ये रेपो दरामध्ये एकूण 1.15 टक्क्यांची कपात करण्यात आली होती.