मोदी सरकारचा मोठा निर्णय : आज अमेरिका तर उद्यापासून फ्रान्सला जाता येणार
मोदी सरकारने अडीच महिन्यांनंतर पुन्हा एकदा देशात आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र तूर्त ही सेवा अमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांशी निगडित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतासोबतच्या द्विपक्षीय सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांसाठी विमान सेवा सुरु करण्याची घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केली. आज 17 जुलैपासून भारत आणि अमेरिकेदरम्यान विमान सेवा सुरु होईल तर उद्या 18 जुलैपासून भारत आणि फ्रान्स दरम्यान सेवा सुरु होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान यानंतर जर्मनी आणि इंग्लड या देशांशी अशाच प्रकारे करार करून विमान सेवा पूर्ववत केली जाईल, असेही हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले.
या विषयी अधिक माहिती देताना पुरी म्हणाले की , उद्यापासून (दि. 18 जुलै) एअर फ्रान्स 28 फ्लाईट्स सुरु करणार आहे. ही सेवा दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि पॅरिस यांच्या दरम्यान सुरु होणार आहे. अमेरिकेकडून युनायटेड एअर लाईन्स 18 इंटरनॅशनल विमान फ्लाईट्स सुरु करणार आहे. या फ्लाईट्स 17 जुलै ते 31 जुलै या दरम्यान सुरु राहतील. युनायटेड एअरलाइन्स दिल्ली ते नेवार्क दरम्यान दररोज विमान सेवा देणार आहे. त्याशिवाय आठवड्यातून तीनदा दिल्ली आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान विमान सेवा चालवली जाणार आहे.
सुरुवातीला दि . 25 मे ला हि सेवा सुरु केली तेंव्हा 33 टक्के आसन क्षमेतची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर त्यात 26 जून रोजी वाढ करण्यात आली. आता 33 ते 45 टक्के आसन क्षमतेची परवानगी देण्यात आली आहे. सरकारने विमान कंपन्यांना आणि विमानतळ हाताळणार्या कंपन्यांना सोशल डिस्टंसिंगचे कडेकोट पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बोर्डिंगपास काढताना तसेच प्रतिक्षालयातील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तसेच विमानात देखील दोन आसनामध्ये एक आस रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना करोनापासून संरक्षित करण्यासाठी तोंडावर मास्क, आवरण, हातमौजे अशा प्रकारच्या उपायोजना विमान कंपन्यांनी आणि विमानतळ प्राधिकरणाने केल्या आहेत.
विशेष म्हणजे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या कठोर लॉकडाउनमुळे 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घालण्यात आली होती. या काळात केवळ वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाची विशेष विमान सेवा सुरु होती. मागील अडीच महिने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती. यामुळे विमान कंपन्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. गेल्या महिन्यात काही कंपन्यांनी आगाऊ तिकीट बुकिंग सुरु केले होते. मात्र नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान सेवा इतक्यात सुरु होणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर तिकिटांचे बुकिंग रद्द करावे लागले होते.