कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचे स्मरण करीत पंतप्रधानांचे आवाहन
कारगिल विजयाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जवानांच्या शौर्याचे स्मरण करतानाच युद्ध काळात जवानांचे मनोधैर्य खच्ची होईल असे वक्तव्य न करण्याचे आवाहन केले. यावेळचा स्वातंत्र्य दिन वेगळ्या परिस्थितीत साजरा करावा लागणार आहे, असे सांगत त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरोना मुक्त होऊ, आत्मनिर्भर भारताचा तसेच नवीन शिकण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी देशातील सध्याची परिस्थिती यावर भाष्य केले, तसेच 10वीच्या परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले. मोदी म्हणाले की, भारताचा रिकव्हरी रेट हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तर मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. मात्र असे असले तरी, कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे. आपल्याला खूप जास्त सावधान रहावे लागणार आहे. कोरोना अजूनही तेवढाच धोकादायक आहे, जेवढा आधी होता. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. देशात गेल्या 24 तासांत 48 हजार हून अधिक कोरोना रुग्ण सापडले. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 13 लाखांहून अधिक झाली आहे.
मोदी पुढे म्हणाले की, आता युद्ध केवळ सीमेवरच लढले जात नाही तर देशातही लढले जाते. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका ठरवावी लागेल. मागील काही महिन्यांपासून देशाने कोरोनाचा सामना एकजुटीने केला. त्यामुळे अनेक शंका-कुशंका चुकीच्या ठरल्या. सकारात्मक दृष्टीकोनच आपल्या संकटात संधी देईल, असे ते म्हणाले. बिहारमध्ये वुमन सेल्फ हेल्प गु्रपने मधुबनी पेंटिंग असलेले मास्क बनवायला सुरुवात केली आहे. पाहता पाहता ते जगभर प्रसिद्ध झाले. इशान्यमधील बांबुपासून उच्च दर्जाची कारागिरी यांचा त्यांनी संधीच्या संदर्भात उल्लेख केला.
पाकवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, कारगिल युद्धात ज्या परिस्थितीत झाला ती परिस्थितीत भारत कधीही विसरू शकत नाही. पाकिस्तानने भारतातील जमिन हडपण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते कधीच यशस्वी झाले नाही. मोदी असेही म्हणाले की, विनाकारण प्रत्येकापासून शत्रुत्व घेणे हा दुष्टांचे स्वभान असतो. पाकिस्तानही असेच करत होता. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 28 जून रोजी ’मन की बात’ च्या माध्यमातून देशाला संबोधित केले होते. यावेळी पंतप्रधानांनी चिनी घुसखोरी, लॉकडाउन आणि कोरोना या मुद्द्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मते व्यक्त केली.