सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला आहे. साधारण दर दिवसाला कोरोनाचे 85 ते 95 च्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 97 हजार 894 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 50 लाख पार झाला असून 51 लाख 18 हजार 254 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 83 हजार 198 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्याही 40 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 रुण बरे झाले असून बुधवारी विक्रमी 82 हजार 922 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाविरुद्ध लढा देत असताना भारतात सप्टेंबर महिन्यात मात्र खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मृत्यूदर आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाची लागण होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे.