पद नाही देश महत्त्वाचा’
कपिल सिब्बल यांच्या ट्विटने पुन्हा खळबळ स पत्र पाठविण्याचे 5 महिन्यापूर्वी झाले होते प्लॉनिंग
पक्ष सुधारणेसाठी हायकमांडला पाठविण्यात येणारे पत्र प्रतिद्धीमाध्यमात आल्याने काँग्रेस पक्षात वादळ निर्माण झाले. सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठकही या पत्रप्रपंचावरून वादळी ठरली. हे सर्व घडले असतानाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा ‘पद नाही देश महत्त्वाचा’ असे ट्विट करून नवीन वादाला सुरुवात केली आहे. तर हायकमांडला पत्र पाठविण्याचे प्लॉनिंग 5 महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी डिनर पार्टीत झाले असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसच्या कार्यसमितीची सोमवारी सात तास चाललेली बैठक वादळी ठरली. काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेची पुनर्रचना करण्याची मागणी करणारे पत्र पाठवले होते. त्यावर या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या पुढील अधिवेशनापर्यंत हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील असे या बैठकीत ठरले आहे.
दरम्यान काँग्रेस अंतर्गत सुधारणांची आवश्यकता असल्यासंदर्भात पाच महिन्यांपूर्वी अनौपचारिक चर्चा सुरु झाली होती. खासदार शशी थरुर यांनी त्यांच्या निवासस्थानी डिनर आयोजित केला होता. त्यामध्ये पक्षांतर्गत बदलांसंदर्भात चर्चा सुरु झाली होती. अनेक काँग्रेस नेते थरुर यांच्या निवासस्थानी झालेल्या डिनरला हजर होते.
त्या डिनरला उपस्थित असलेल्या बहुतांश नेत्यांनी सोनिया गांधींना सात ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली नाही. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती चिंदबरम, सचिन पायलट, अभिषेक मनू सिंघवी आणि मणिशंकर अय्यर डिनरच्या निमित्ताने झालेल्या या अनौपचारिक बैठकीला उपस्थित होते. पण त्यांनी पत्रावर स्वाक्षरी केली नाही. डिनरला आपणही उपस्थित असल्याची अभिषेक मनू सिंघवी यांनी पुष्टि केली.
शशी थरुर यांनी मला डिनरचे आमंत्रण दिले होते. पक्षामध्ये सुधारणांसदर्भात त्या बैठकीत अनौपचारिक चर्चा झाली. पण या पत्रासंबंधी मला काही माहित नव्हते असे सिंघवी यांनी सांगितले. डिनरच्या निमित्ताने झालेल्या त्या अनौपचारिक बैठकीमध्ये या पत्राची बीजे रोवली गेली.
पुढील तीन-चार महिन्यांमध्ये ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’च्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचीही निवड केली जाणार असल्याचे पी. चिद्म्बरम म्हणाले.
सोमवारी काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याविषयावर भाष्य केले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वासाठी गांधी कुटुंबीयांशिवाय अन्य कोणी नाही का? असा सवाल चिदंबरम यांना यावेळी करण्यात आला.
आम्ही सर्व गोष्टींचा विचार केला आणि त्यानंतर यातून बाहेर निघण्याचा एक मार्ग शोधला. करोना महामारीच्या या काळात आम्ही काही महिन्यांचा वेळ मिळवला आहे, असे ते या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.