भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. ही माहिती धोनीने इंस्टाग्रामवरून दिली. धोनीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर पहिल्यांदा संभ्रम निर्माण झाला होता. धोनीने खरंच निवृत्ती घेतली की नाही, याबाबत उलगडा होत नव्हता. पण काही वेळाने अखेर धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबतचा उलगडा झाला. धोनीने 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. आज धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 क्रिकेटलाही रामराम ठोकला. त्यामुळे धोनी आता भारताच्या जर्सीमध्ये चाहत्यांना दिसणार नाही.
धोनीच्या नेतृत्वखाली भारताने 2007 साली ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2011 साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. कारण धोनी कर्णधार असताना भारताने सर्वात जास्त सामने जिंकले होते. धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाची चांगली बांधणी केली होती. त्याचबरोबर काही खेळाडूंना घडवण्यामध्ये धोनीचा सिंहाचा वाटा होता. धोनी सध्या आयपीएलचा विचार करत असेेल, असेच चाहत्यांना वाटत होते.
सुरेश रैनाने जाहीर केली निवृत्ती
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने अचानक सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केल्याने चाहत्यांना धक्का बसला. धोनीच्या निवृत्ती पाठोपाठ भारतीय संघातील त्याचा सहकारी सुरैश रैना याने देखील निवृत्ती जाहीर केली आहे. भारताकडून रैनाने 226 वनडे, 78 टी-20 आणि 18 कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघाकडून त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2018 मध्ये खेळला होता. धोनीने सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच रैनाने देखील सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर करत असल्याचे सांगितले.