औरंगाबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली अन गेल्या दोन महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांनी मशागतीचे काम सुरू केले. या मशागतीवर निवडणूक लांबल्याने पाणी फेरले गेले आहे. जनतेला आपलेसे करण्यासाठी इच्छुकांनी वार्डा- वार्डात आश्वासनांचे गाजर वाटले होते. निवडणूक लांबल्याने आता इच्छुक तिकडे फिरकेनासे झाले आहेत. दुसरीकडे नागरिकांवर मात्र क्या हुआ तेरा वादा ! असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू होती. वार्ड आरक्षण आणि वार्ड रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांचे जणू पेवच फुटले. प्रत्येक पक्षाकडे तिकीट मागणार्यांची संख्या भरमसाठ वाढली. अनेकांनी तर गेल्या सहा महिन्यांपासून समाजसेवेचे कार्य सुरू केले होते. वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करणे, मोठ मोठे बॅनर लावणे, रस्त्यावर मुरूम टाकणे, विद्युत खांबावर दिवे बसविणे, ड्रेनेज लाईनची छोटी-मोठी कामे त्याचबरोबर आरोग्य शिबिरे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इच्छुकांनी केला होता. तर नव्या वसाहतीत अनेकांनी मोफत पाण्याचे टँकरही सुरू केले होते. काही उमेदवारांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करून आपल्या समस्या सांगा, असे जाहीर आवाहनही केले. त्यानुसार समस्यांचा पाऊस पडला. कुणाला विद्युत दिवे हवे होते, कुणाला रस्ता तर कुणाला कचरा गाडी हवी होती. त्याबरहुकूम इच्छुकांनी सेवा देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः नव्या वसाहतींमध्ये समस्यांचा डोंगर उभा आहे. महानगरपालिकेची कोणतीच सेवा या वसाहतीपर्यंत पोहोचली नाही. अशा हर्सूल परिसरातील जवळपास दहा ते पंधरा वसाहती, गारखेडा परिसरातील तसेच पडेगाव सातारा परिसरातील असंख्य वसाहती समस्यांच्या विळख्यात आहेत. या सर्व भागात इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध विकास कामांना प्रारंभ केला होता. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. जेणे करून अशाप्रकारे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू असा प्रयत्न सर्वच इच्छुकांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्याने अनेक इच्छुक आता गायब झाले आहेत.
पाणी टँकर झाले बंद !
नव्या वसाहतींमध्ये काही इच्छुकांनी जनतेची सेवा करण्यासाठी मोफत पाणी टँकर सुरू केले होते. जाधव वाडी, मयूर पार्क , हर्सूल परिसरातील काही वसाहतींना मोफत पाण्याची वाटप सुरू झाले होते. मात्र, आता हे पाणी टँकर गायब झाले आहेत. महानगरपालिकेची निवडणूक लांबली तसे इच्छुक आता भूमिगत झाल्याचे दिसते. बोटावर मोजण्याइतक्या उमेदवारांनी जनसेवा सुरू ठेवली असली तरी बहुसंख्य इच्छुक मात्र आता परागंदा झाले आहेत.
क्या हुआ तेरा वादा !
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करणार्यांनी जनतेला आश्वासनांचे गाजर दाखविले होते. वॉर्डातील समस्या सोडवण्याचे जाहीर आश्वासनही अनेकांनी दिले होते. रस्ते, विद्युत पोल, विद्युत लाईट, ड्रेनेज लाईन यासह अनेक विकास कामांचे आश्वासन इच्छुकांनी मतदारांना दिले. मात्र, आता निवडणुका लागल्या तसा इच्छुकांचा संपर्कच बंद झाला आहे. त्यामुळे मतदार आता क्या हुआ तेरा वादा असे म्हणत इच्छुकांचा शोध घेत आहेत.