जालना- आगामी लोकसभा निवडणूकीत खासदार रावसाहेब दानवे यांना आव्हान देण्याची भाषा करणारे आ. बच्चू कडू यांनी जालन्यात त्यांची संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यासाठी केला आत्मदहनाचा प्रयत्न
घरकुल योजनेत झालेला भ्रष्टाचार, वित्त आयोग आणि गावात न होणाऱ्या ग्रामसभा याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या बठाण येथील कार्यकर्त्यांनी जिल्हापरिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असणाऱ्या आ.बच्चू कडू यांचा जालना जिल्ह्यात चांगलाच बोलबाला तयार होत आहे. त्त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज (ता.१४) आत्मदहनाचा प्रयत्न करुन प्रशासनास वेठीस धरले. जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावात नेमून दिलेल्या घरकुल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समितीने सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कागदोपत्रीच चौकशी अहवाल सादर केला असल्याचा आरोप येथील कार्यकर्त्यांनी केला आहे.
ही चौकशी गावकऱ्यांना विश्वासात न घेताच केली गेली असल्याने ती बोगस असून, त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी याआधी अनेकदा अर्ज दाखल केले होते आणि उपोषणाला ही बसले होते. अनेक मार्गाने अर्ज विनंती करून ही त्यावर योग्य ती कार्यवाही होत नसल्याने बुधवारी(ता.१४) दुपारी प्रहारच्या तब्बल 40 कार्यकर्त्यांनी जिल्हापरिषदेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः यात महिलांचा समावेश लक्षणीय होता. यावेळी राहुल अजमाने, प्रदिप शिंदे, राजेंद्र गायकवाड, श्याम गायकवाड, नवनाथ गायकवाड, रवि बागल आदी उपस्थित होते.