सिल्लोड-सोयगावातील भाजप कार्यकर्ते बंडाच्या पावित्र्यात; आ. अब्दुल सत्तारांच्या पक्ष प्रवेशाच्या अडचणीत वाढ

Foto

औरंगाबाद:  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला महाराष्टांत घवघवीत यश मिळाले. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विधानसभेची भाजपातर्फे जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजपातर्फे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची फोडाफोडी करण्यात येत आहे. सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील काँग्रेसचे बडतर्फ आ. अब्दुल सत्तार हे ही भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्याकडून भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सत्तारांना पक्षात प्रवेश दिल्यास भाजपात मोठी बंडाळी उठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी जाहीर मेळावा घेऊन सत्तारांना आपला उघड उघड विरोध दर्शविल्याने सत्तारांच्या भाजपा पक्ष प्रवेशात अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाजपा नेते हा तिढा कसा सोडवितात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लोकसभा निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही. तसेच आपल्या इच्छे विरुद्ध आ. सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आ. सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. तसेच निवडणुकीत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांना काँग्रेसने पक्षातून बडतर्फ केले. लोकसभा निवडणुकीपासून सत्तार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी सलगी वाढविली होती. तसेच काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या संपर्कात होते. विखे यांच्याससह सत्तार भाजपात प्रवेश करणार हे निश्‍चित होत असल्याने सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यात चलबिचल होण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील काही प्रमुख नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी संपर्क साधून आ. सत्तारांना प्रवेश देऊ नये असे सांगितले. परंतु रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेताच कार्यकर्त्यांनाच झापले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मंगळवारी सिल्लोड मध्ये हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आ. सत्तारांच्या पक्ष प्रवेशाला जाहीर विरोध केला. 

यावर ही सत्तार यांना प्रवेश दिला तर पक्षातील प्रमुख मंडळी ठरवतील तो एक उमेदवार सत्तार यांच्या विरोधात उभा केला जाईल असा इशाराही कार्यकर्त्यांनी श्रेष्ठीला दिला आहे. आता आ. सत्तार यांच्या पक्ष प्रवेशात अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाजपा आणि सत्तार यांच्य कार्यकर्त्यात मोठे हाड वैर आहे. गेल्या दोन दशकात सत्तार यांनी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविलेले आहे. तसेच प्रत्येक निवडणुकीत जातीयवाद पसरविलेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते सत्तार यांना विरोध करीत असल्याचे दिसते. भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष व केंद्रियमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघात सिल्लोड, सोयगाव विधानसभा मतदार संघ येत असल्याने तसेच सत्तार यांनी त्यांना या निवडणुकीत मदत केल्याने दानवे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे दानवे हे सत्तारांच्या प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पण कार्यकर्त्यांच्या बंडाळीमुळे आता दानवे काय निर्णय घेतात. तसेच बंडाळी कार्यकर्त्यांना कसा चकवा देतात हे येणारा काळच ठरविणार.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker