अडवाणी, उमा भारती, जोशींसह 32 जण निर्दोष
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मोरेश्वर सावे यांचाही आरोपींमध्ये होता समावेश
1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष लागले होते. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. तसेच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगण्यात आले. निकाल सुनावला जात असताना 26 आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती.
सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितलं की, विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचे निदर्शनात आल्याचे न्यायालयाने यावेळी सांगितले.
या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी 16 सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचा तपास करणार्या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. 48 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी 16 जण खटला सुरु असताना मरण पावले. 16 व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता. दरम्यान न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते.
एकूण आरोपींची नावे
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर
6 नेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर
कोर्टात सहा आरोपी उपस्थित नाहीत. लालकृष्ण आडवाणी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून कोर्टाशी संपर्क केला. तर मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान, महंत नृत्यू गोपाल दास, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंहही कोर्टात पोहोचले नाहीत. या व्यतिरिक्त इतर सर्व आरोपी उपस्थित आहेत. विशेष जज एसके यादव यांच्या कार्यकाळात हा निर्णय येत आहे. विशेष जज एसके यादव यांच्या कार्यकाळाचा आज अखेरचा दिवस असले. 30 सप्टेंबर 2019 ला ते रिटायर होणार होते, मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सेवा विस्तार दिला.
बाबरी मशिदीचा ढाच्या पडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्वादी संघटना पुढे आली नव्हती. अशा वेळी प्रखर हिंदुत्ववादी नेते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत औरंगाबाद येथील खासदार मोरेश्वर सावे व ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक कारसेवेला गेले होते. त्यांनी कारसेवेत सहभाग घेत हा ढाचा पाडला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, मोरेश्वर सावे,सतीश प्रधान यांना आरोपी करण्यात आले होते.
10 मिनिटांत दोन एफआयआर
पहिले एफआयआर प्रकरण संख्या 197/92 हे प्रियवदन नाथ शुक्ल यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात सर्व अज्ञात लोकांविरूद्ध कलम 395, 397, 332, 337, 338, 295, 297 आणि 153ए मध्ये गुन्हा दाखल केला. दूसरे एफआयआर प्रकरण संख्या 197/92 हे चौकी इंचार्ज गंगा प्रसाद तिवारीकडून आठ नामांकित लोकांविरुद्ध दाखल करण्यात आले. ज्यामध्ये भाजपचे लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, डॉ. मुरली मनोहर जोशी, तत्कालीन खासदार आणि बजरंग दल प्रमुख विनय कटियार, तत्कालीन व्हीएचपी महासचिव अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा, विष्णु हरि डालमिया आणि गिरिराज किशोर यांचा समावेश होता. यांच्याविरोधात कलम 153ए, 153बी, 505 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर जानेवारी 1993 मध्ये 47 इतर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यामध्ये पत्रकारांना मारहाण आणि लूट अशा प्रकारचे आरोप होते.