मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि शेवटचा टप्पा पुढील आठवड्यात पार पडणार असून, या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यालगतच्या दहा लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघांच्या रणनीतीसाठी सेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकार्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.
राज्यात युतीच्या बाजूने अनुकूल वातावरण असून, मुंबई व ठाण्यात जराही दगाफटका होता कामा नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकांमधून पदाधिकार्यांना दिल्या आहेत. राज्यात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 17 मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आदी दहा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील सहा जागा शिवसेना लढवत आहे. या मतदारसंघांतील शेवटच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या तीन दिवसांपासून मातोश्रीवर बैठका घेण्यात येत आहेत. राज्यात सर्वत्र युतीच्या बाजूने वातावरण असून, व्हिडीओ, कात्रणांच्या आधारे भाषण करणार्यांकडे फारसे लक्ष देऊ नका, विजय आपलाच आहे. मुंबई आणि ठाण्यातही कोणताही दगाफटका होता कामा नये, असे सांगून शेवटच्या टप्प्यात कोणाशी बोलले पाहिजे, कोणाची नाराजी असल्यास ती दूर केली पाहिजे, याबाबात ठाकरे पदाधिकार्यांशी सविस्तर चर्चा करीत असल्याचे कळते. काँग्रेस तसेच मनसेची नाकाबंदी करण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.