औरंगाबाद
वर्धापन दिनानिमित्त दोन ठिकाणी आयोजित कार्यक्रमाचा वाद ताजा असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे चांगलेच बरसले. काही लोक पक्षात विष करण्याचे काम करीत आहेत. मात्र ते यशस्वी होणार नाही. पैसे घेऊन तिकीट वाटप करणारा मी नेता नाही, असा अप्रत्यक्ष टोलाच आ. अंबादास दानवे यांचे नाव न घेता लगावला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त काल पहिल्यांदाच खैरे आणि दानवे यांचे दोन वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. गेल्या पाच-सात वर्षांपासून धुमसणाऱ्या या वादाने आता टोक गाठल्याचे घातल्याचे बोलले जात आहे. या वादावर बोलताना खैरे म्हणाले, शिवसैनिक मुळीच अस्वस्थ नाहीत. सेनेच्या स्थापनेपासूनच गुलमंडीवर वर्धापन दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत असतो. मातोश्रीला याची कल्पना आहे. हाच कार्यक्रम अधिकृत असतो त्याची शिस्त मोडून कोणी इतरत्र कार्यक्रम घेत असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागेल. शिवपूजन कार्यक्रमाला कुणाचाही नकार नाही मात्र पक्ष शिस्तीत राहून कार्यक्रम करायला हवा. शिवसेना मोठ्या संघर्षाने उभी राहिली आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी लाठ्या खाऊन, जेलमध्ये जाऊन प्रसंगी रक्त सांडून पक्ष उभा केला. सन्मान दिला जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त सात दिवस कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी कोरूना संकटाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एक दिवस कार्यक्रम घेण्यात आला. काही लोक विष कालवतात
पक्षात मीच मोठा आहे असे दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करून विष कालवण्याचे काम करीत आहेत. शिवसैनिक अशा नेत्यांच्या मागे उभे राहत नाहीत. यामुळे नाहक संभ्रम निर्माण होतो. गटबाजी, समर्थकांना उभे करून नेता बनण्याचा प्रयत्न करतात. जातीय वादाने पक्षाची हानी होते यामुळेच लोकसभेत शिवसेनेचा पराभव झाला, असा आरोप खैरेनी केला.
पैसे घेऊन तिकीट वाटप
राजकारण आता बदलले आहे. झटपट प्रसिद्धी आणि पैसा राजकारण्यांना हवा असतो. त्यासाठी ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात. पैसे खाऊन पक्षाचे तिकीट वाटप करतात, उद्योजकांना त्रास देतात, असा थेट आरोप त्यांनी दानवेंचे नाव न घेता केला.