भाजप नेत्याच्या मुलाकरिता कोटला कॉलनी वॉर्ड रचनेत बदल

Foto

औरंगाबाद  :- मनपा निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेवर मोठ्या प्रमाणात आक्षेप  घेतले जात आहेत. काही ठराविक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार वॉर्ड रचना करून घेतल्याचे आरोप देखील झाले आहेत. याच दरम्यान आता कोटला कॉलनी या वॉर्डातून एका भाजप नेत्याचा पुत्र नगरसेवक होण्यास इच्छुक आहे. यामुळे चक्क या वॉर्डाच्या सीमा बदलण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. यानंतर वॉर्ड रचनेतील गोलमाल पुन्हा एकदा समोर आला. 

यंदाची मनपा निवडणूक एप्रिल मध्ये पार पडेल. याकरिता वॉर्ड रचना तयार करण्यात आली व आरक्षण सोडत देखील घेण्यात आली. ही सोडत होताच सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून यावर जोरदार आक्षेप घेतले जात आहेत.वार्ड रचना व आरक्षण सोडत करताना पूर्णपणे नियमाला फाटा देण्यात आल्याचे आरोपही पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर केले आहे. एवढेच नव्हे तर यात भ्रष्टाचार देखील केल्याचे गंभीर आरोप नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आले. याच दरम्यान गेल्या वेळेस वार्ड क्रमांक ६९ असलेला कोटला कॉलनी समतानगर या वॉर्डच्या हद्दीतही बदल करण्यात आला. नवीन वॉर्ड रचनेनुसार हा वॉर्ड क्रमांक ६७ कोटला कॉलनी असा करत यातून समतानगर ही वसाहत वगळण्यात आली. या वॉर्डातून एका भाजपच्या बड्या स्थानिक नेत्याचा पुत्र नगरसेवक होण्यास इच्छुक आहे. यामुळे त्या दृष्टीने सोयीस्कर होईल अशा पद्धतीने ही वॉर्ड रचना झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यामुळे वॉर्ड रचनेतील आणखी एक गोलमाल समोर आला. 


माझी पत्नी येथे विद्यमान नगरसेविका आहे. नवीन रचनेत वॉर्डातील समता नगर ही वसाहत वगळण्यात आली. एका भाजप नेत्याच्या पुत्रा करिता नियमबाह्य पद्धतीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वॉर्डच्या हद्दी बदलण्यात आल्या आहेत.



एका माजी अधिकाऱ्याचाही प्रयत्न 

या भाजप पदाधिकाऱ्याचा एक नातलग मोठ्या प्रशासकीय पदावरून सेवानिवृत्त झालेला आहे. त्यानेदेखील या सर्व प्रकरणात अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करीत प्रयत्न केले असल्याचे देखील विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker