संभाजीनगर च्या मुद्द्यावरून आमदार अंबादास दानवे यांनी भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांवर टीकेचे बाण सोडले होते. भाजप नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे, नसता रस्त्यावर उतरू असा इशारा इशाराच दानवे यांनी दिला होता. त्यावर प्रदेश पातळीवरील नेत्यांवर टीका करण्याची आ.दानवेंची लायकी नाही अशा शब्दात भाजपा नेत्यांनी त्यांना सुनावले.
महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने आता संभाजीनगर चा मुद्दा जोर धरू लागला आहे. भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष केले. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना दूर गेल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती. भाजपची टीका शिवसेनेला चांगली झोंबली. आमदार अंबादास दानवे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले. संभाजीनगर चा मुद्दा शिवसेनेने सोडला नाही, त्याचबरोबर हिंदुत्वाच्या रस्त्यावरूनही शिवसेना मुळीच ढळली नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे, त्यांनी तोंड सांभाळून बोलावे नसता शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही आमदार यांनी दानवे यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार अतुल सावे यांनी शिवसेनेवर टीका केली. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सोबत युती असल्यानेच शिवसेनेचे आमदार निवडून आलेत हे त्यांनी विसरू नये. हिंमत असेल तर वेगळे लढवून आमदार निवडून आणून दाखवावेत असे थेट आव्हान त्यांनी शिवसेनेला दिले.
शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आमदार दानवे यांनी जिल्हा पुरते मर्यादित रहावे. प्रदेश पातळीवरील नेत्यांवर टीका करू नये, असे सुनावले. आपली मर्यादा दानवे विसरल्याचे ही ते म्हणाले. हिंदुत्ववाद्यांशी शिवसेनेने गद्दारी केली. जनतेचा आदेश पायदळी तुडवून काँग्रेस सोबत युती केल्याने शिवसेनेचे खरे रूप आता जगासमोर आले आहे. त्यामुळे शिवसेनेने आता हिंदुत्व बद्दल बोलूच नये, असा टोलाही केणेकर यांनी लगावला.
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी संभाजी नगरच्या मुद्द्यावर भाजपनेच आतापर्यंत काम केल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिकेत आम्ही पाच वेळा ठराव केला. सर्वसाधारण सभेत घोषणाबाजीही केली. आता हा चेंडू शिवसेनेकडे असल्याने ते या पासून दूर पळत आहेत. प्रदेश पातळीवरील नेत्यांवर टीका करण्याची आमदार दानवे यांची लायकी नाही असेही औताडे म्हणाले.