औरंगाबाद: ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाने शिवसेनेचे भविष्य घडविले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लाखोंच्या सभा ज्या मैदानाने पाहिल्या. ते मैदान भरण्यासाठी शिवसेनेला करावी लागलेली कसरत पाहता सेनेला अतिआत्मविश्वास नडला असेच म्हणावे लागेल. तर मैदानाने सेनेला हात दाखविल्याची चर्चा आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान म्हणजे शहराची शान. या मैदानावर सभा घेण्याची हिंमत भलेभले राजकीय पक्ष करीत नाहीत. सहज 75 हजार आणि दाटीवाटीने लाखभर प्रेक्षकांची क्षमता असलेले हे मैदान बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांमुळे गाजले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैदान गाजवण्याची किमया केली. सेनेचा बालेकिल्ला असल्याने कायमच या मैदानावरील सभांना उदंड प्रतिसाद मिळाला. शहरात सेनेचा उगम आणि वाटचालीचे साक्षीदार असलेले हे मैदान आता सेनेवर रुसल्याचे दिसते. काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमविताना युतीच्या नाकी नऊ आले. सहा वाजले तरी मैदान रिकामे असल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर कार्यकर्त्यांना फोनाफोनी करीत बसेस आणि मिळेल त्या वाहनाने लोक आणावे लागले. श्रोत्यांअभावी मैदान रिकामी असल्याने सायंकाळी सहा वाजता सुरू होणारी सभा तब्बल तासभर लांबली. तोपर्यंत उपस्थित नेत्यांनी भाषणाद्वारे किल्ला लढवला. आमदार प्रशांत बंब यांना नाईलाजाने का होईना भाषण लांबवत न्यावे लागले. सात वाजेच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले तरी काही खुर्च्या रिकाम्याच होत्या. सेनेच्या हाकेला ओ देणारे हे मैदान अर्धे रिकामे होते. या रिकामपणाची चर्चा आता झडू लागली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर सभा घेण्याचे खैरे यांचे धारिष्ट अंगलट आले का, जनता सेनेवर नाराज आहे अशा चर्चांना आता तोंड फुटले आहे. एकंदरीत हक्काच्या मैदानाने सेनेला हात दाखवला, असेही बोलले जात आहे.