औरंगाबाद: गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागाच्या भक्कम आधारावर खैरेंनी दिल्ली काबीज केली. ज्या कन्नडमधून खैरेंना हमखास भरघोस लीड मिळते त्याच कन्नडचे भूमिपूत्र आ. हर्षवर्धन जाधव मैदानात असल्यामुळे कन्नडच्या मतदारांचा कौल बदलला आहे. कन्नडमध्ये जाधवांचे ट्रॅक्टर जोरात नांगरत आहे. आ. सुभाष झांबड वैजापूरचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांनीही येथे प्रचारात मुसंडी मारली आहे.
गेल्या वेळी ग्रामीणच्या तीन तालुक्यातून खैरेंना तब्बल १ लाख ३० हजारांची लीड मिळाली होती. हेच तीन ग्रामीण तालुके यावेळी विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे निवडणुकीतील रंगत अधीकच वाढली. गेल्या दोन निवडणुकीचे विश्लेषण केले तर २००९ साली उत्तमसिंह पवारांच्या विरोधातखैरेंना कन्नड (२२१४१) वैजापूर (१३७१३) आणि गंगापूर (३१५४) या तीन तालुक्यातून ५६ हजारांची लीड होती. २०१४ च्या निवडणुकीत याच तीन तालुक्यांनी खैरे बाबांच्या पदरात तब्बल १ लाख ३० हजार मतांचे भरभरून दान टाकले होते. वैजापूर तालुक्याने सर्वाधिक ४० हजार ५८, कन्नड ४१००० तर गंगापूर तालुक्याने ४० हजार ६०५ एवढी लीड दिली होती. मतांचे भरभरून दान टाकणार्या तीन तालुक्यांतील मतदारांचा कौल बदलला आहे. त्याला कारणही तसेच आहे. कन्नडचे भूमिपुत्र असल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टर तालुक्यात जोरात पळू लागले आहे. तसेच शांतीगिरी महाराजांनी आ. जाधव यांना आशीर्वाद दिला आहे. वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात शांतिगिरी महाराजांना मानणारा भक्त परिवार मोठा आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार आ. सुभाष झांबड वैजापूरचे भूमिपुत्र आहे. त्यामुळे वैजापूरही यावेळी खैरेंना किती मदत करेल हे येणारा काळच ठरवेल. तसेच वैजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्यामुळे झांबड यांना मदत होणार आहे. गंगापूर तालुक्याचा विचार केला असता येथेही वातावरण खैरे यांच्या विरोधातच आहे. त्यामुळे ज्या ग्रामीण मतदारांच्या भरवशावर खैरे दिल्लीस्वार होतात यावेळी मात्र वेगळे चित्र दिसले तर नवल वाटायला नको.
शहर ग्रामीण फिफ्टी-फिफ्टी
औरंगाबाद लोकसभेतची रचना अतिशय रंजक आहे. तीन मतदारसंघ ग्रामीण तर तीन मतदारसंघ शहरी आहेत. शहरी पश्चिम वगळता पूर्व आणि मध्य मतदार संघाने खैरेंना कधीही लीड दिली नाही. गेल्या वेळी पश्चिम मतदारसंघ पाठीशी उभा राहिला असला तरी यावेळी मात्र उलट चित्र दिसेल असे बोलले जाते. खैरेची मदार याच तीन ग्रामीण तालुक्यांवर आहे. विरोधकांनी याच तालुक्यांना लक्ष केले. शहर पाठीशी नाही अन ग्रामीण भागाने यावेळी पाठ फिरवल्याने खैरे पार घायाळ झालेत. हक्काचे तालुके हात तर दाखवणार नाही ना, या चिंतेने सेनेच्या गोटात अस्वस्थता आहे.