' काल माझ्या बायकोला कॉल आला, तिने हॅलो म्हटल्यावर समोरून आवाज आला मी आसावरी बोलतेय, झी मराठी मधून आणि ती एकदम खूषच झाली, आणि सगळ्यांना सांगत सुटली.'
आश्चर्य वाटलं ना हे ऐकून, पण हे खर आहे. उद्या जर मोबाईल वर तुम्हाला हॅलो म्हटल्यावर समोरून मी आदेश बांदेकर बोलतोय, निलेश साबळे बोलतोय, भाऊ कदम बोलतोय, राणादा बोलतोय असे आवाज आले तर बिलकुल आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण ही आपली आवडती कलाकार मंडळी तुमच्याशी संवाद साधत आहेत. कारण जसजसा १३ जुलै मनोरंजनाचा शुभारंभ जवळ येतोय, तसतसं कलाकार मंडळींमध्ये सुद्धा उत्साह शिगेला पोचला आहे. त्यामुळे आता ही मंडळी हाथ धुवून मनोरंजन करायच्या मागे लागली आहेत.
जवळपास साडेतीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे पुनरागमन होणार आहे आणि याचनिमित्ताने झी मराठीचे लाडके कलाकार प्रेक्षकांना रेकॉर्डेड फोन करून आपल्या कमबॅकबद्दल सांगणार आहेत.
भाऊ कदम, डॉ. निलेश साबळे, आदेश बांदेकर, निवेदिता जोशी- सराफ, अनिता दाते, हार्दिक जोशी हे स्वतःहून प्रेक्षकांना फोन करून त्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहेत. तब्बल ५० लाख कॉल्स करून प्रेक्षकांना आपल्या पुनरागमनाबद्दल सांगणार आहेत. याआधी क्वचितच कोणत्याही कॅम्पेनसाठी खुद्द कलाकारांनी पुढाकार घेऊन चाहत्यांना असा थेट फोन केला असेल. ही आगळीवेगळी संकल्पना घेऊन झी मराठीचे कलाकार रेकॉर्डेड फोन कॉल्समार्फत लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उत्सुक आहेत