किशोर दास पडोसन मधलं 'एक चतुर नार' हे गीत काल वारंवार आठवत राहिलं. अखेरच्या टप्प्यातील सभांचा धडाका आणि लोकांच्या जमवाजमवीची कसरत यावर हे गीत चपखल बसलं. उन्हाचा कडाका, निवडणुकीत उभे भरमसाठ उमेदवार यामुळं प्रचारसभाना माणसच मिळेनाशी झालीत. गर्दी जमवण्यासाठी उमेदवारांना घाम फुटू लागला आणि मग सुरु झाली बोलचाल. नेते जेवढे चतुर तेवढे त्यांचे चेले अति चतुर ! गर्दी जमवण्यासाठी सौदा ठरविताना रोजगार हमी आर्ध्यात आम्ही अशी त्यांनी शक्कल लढवली. आता या शकलेची बोंब उठली आहे. गल्लीबोळात या चतुराईची गरमागरम चर्चा होत आहे. मुन्ना चतुर निघाला, मेव्हण्याला नेले अन साल्याच्या हातात दिले ! सुनेच्या वाट्याला सासूचा फाटा, बाप इकडं अन पोरगा तिकडं, पैशावरून बिनसलं दोन्हीकडे झालं वाकडं. असे अजब गजब किस्से घडलेत. या बेईमान चेल्याचा फटका आता उमेदवारांना बसणार आहे. हेच ते लोक आहेत जे उमेदवारांची लाज राखतात. कोणत्याही सभेला अगदी प्रामाणिकपणे वेळेवर हजर होतात. कमी पडतील तेवढे श्रोते देण्याची ताकत याच बहाद्दरांमध्ये आहे. कोणत्याही सभेत वेळेवर येणाऱ्या लोकांपेक्षा नंतर येणारे हे लोक भाव खाऊन जातात. यांचा थाट काही औरच असतो. बँड पथक, ढोल ताशांच्या दणदणाटात यांचे आगमन होते. हातात मोठमोठे झेंडे अन तालासुरात दिल्या जाणाऱ्या घोषणा सभेचे माहोल बदलण्याऱ्याच असतात. असं चित्र दिसलं तर समजा हे प्रशिक्षित मोर्चेकरीच. सभा आणि मिरवणुकांना माणसं जमा करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. व्यवसायिक बँड पथके, ढोल पथके आणि आता व्यावसायिक मोर्चेकऱ्यांची पथके निर्माण झालीत. उमेदवारांना हवी ती मदत करणारी यंत्रणा मार्केटमध्ये उपलब्ध झालीये. सांगाल ते मिळेल मात्र पैसा मोजावा लागेल. खरे तर या निवडणुकीत हवा तसा जोर उमेदवारांनी लावलाच नाही. चौरंगी लढती मुळे आता आपल्याला अच्छे दिन येतील असं समजणाऱ्यांचा भ्रमनिरास झालाय. या निवडणुकीच्या वाटसरूंना उमेदवाराचे दर्शनही होणं दुरापास्त झालं. अहो उमेदवार दिसायला तयार नाही, अशी यांची तक्रार कानी येऊ लागली. उमेदवार पाहण्यासाठी आतुरलेले हे डोळे खरेच तडजोड करणारे असतात. या तडजोड वाल्यांना राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या वेळी टांग दिलीय. कमाईच नसल्याने या लोकांचा टांगा पलटी झालाय. निवडणुका आल्या की सगळ्या उधाऱ्या नील करण्याची यांची पद्धत. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते खासदारकी पर्यंतच्या इलेक्शनची हे लोक डोळ्यात प्राण आणून वाट बघत असतात. यावेळी मात्र त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आता हे लोक कर्जाच्या बोजातून बाहेर पडणार नाहीत, असं दिसतंय. त्यामुळे यांचा ऐकू येणाऱ्या गलक्याने आणि ओरडण्याने उमेदवारांच्या आणि कानावरची ऊ हलत नाहीये. मतदानाचा विजय आणि पराभवाच्या अंतराला कमी करणारी ही जमात जणू प्रवाहाबाहेरच पडली. या लोकांना कुणीही विचारेनास झालंय. गर्दी जमवणे पुरताच यांचा वापर होत होता, मात्र यावेळी मोठमोठ्या सभाच कमी झाल्याने पंचाईत झाली. एक तर कमाई नाही त्यात वाटे झाले. अनेकांनी चतुराई करून यांच्या कमाईवरच डल्ला मारल्याने मोठी ओरड होतेय. या लबाड चेल्यांना गल्ली गल्लीतून शिव्या खाव्या लागताहेत. तुला लाज, शरम काही वाटते का ? असा एका महिलेचा सवाल सारं स्पष्ट करून जातो . अरे जा तुझी इमानदारी तुझ्यासोबत असं म्हणत घराकडे परतणार्या नाराज महिलांचा जथ्था आपला नव्हताच आणि आपला राहणार नाही याची खात्री पेटलेल्या चेल्यानी धोका दिला. म्हणूनच बोलचाल झालेली रक्कम ही त्यांच्या हातात देत नाही. सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी प्रचंड व्यावसायिकता जपल्याने या लोकांचा भ्रमनिरास झाला. हे नाराज लोक आता कुणाच्या पारड्यात मत टाकतात हे पाहावे लागेल.