अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील खडाजंगी उभ्या महाष्ट्राने पाहिली. युतीची घोषणा होऊन देखील खोतकर हे दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या दोन नेत्यांमधील वितुष्ट कमी करून दिलजमाईचा प्रयत्न केला होता मात्र, आता आपण खूप पुढे गेलो असून आता माघार घेणे शक्य नसल्याचे म्हणत खोतकर यांनी मैदान सोडले नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या वतीने सुभाष देशमुख यांची शिष्टाई देखील निष्फळ ठरल्याने खोतकर निवडणूक लढविणार कि नाही याबद्दल मतदारांमध्ये सस्पेन्स कायम होता.
यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा प्रयत्न देखील निष्फळ ठरला. अखेर औरंगाबाद येथे शिवसेना भाजपा संयुक्त मेळाव्याच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीने खोतकर यांनी माघार घेतली व आपण युतीधर्म पाळण्यासाठी माघार घेत असल्याचे म्हटले. खोतकर यांनी अचानक माघार घेतल्याने खोतकरांना काँग्रेसचे तिकीट देऊन निवडून आणण्याच्या सिंहगर्जना करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नावर मात्र पाणी फेरले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढवतील अशा अटकळी जिल्हाभर बांधल्या जात होत्या. त्यामुळे काँग्रेस देखील खोतकर यांच्या पक्ष प्रवेशाचीच वाट पाहत होती. मात्र, खोतकर यांनीही युतीधर्म पाळत माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने काँग्रेसने आता उमेदवारासाठी शोधाशोध सुरु केली आहे.
मात्र, जिल्हाभर दबदबा असणारा व खा. रावसाहेब दानवे यांना तागडे आव्हान देऊ शकणारा उमेदवारच काँग्रेसकडे नसल्याने रावसाहेब दानवे यांचा मार्ग सुकर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खा. रावसाहेब दानवे यांना तगडे आव्हान देणारा उमेदवार देण्याचे मोठे आव्हान काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वापुढे आहे.