दिल्ली : वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे कठीण शस्त्रक्रिया सहज पार पाडल्या जात आहेत. नवजात बालकांवरील गुंतागुतींच्या शस्त्रक्रियाही यशस्वी होत आहेत.आता एम्स रुग्णालयाने त्याही पुढे जाऊन मोठी कामगिरी पार पाडली आहे. एम्सच्या डॉक्टरांनी आईच्या गर्भातील बाळावरच शस्त्रक्रिया केली आहे. यामुळे बाळाच्या जन्मानंतर ते सुदृढ जन्माला येऊ शकेल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. बाळाच्या हृदयवरील शस्त्रक्रियेसाठी इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट आणि भ्रूण चिकित्सा तज्ज्ञांनी डायलेशनची यशस्वी प्रक्रिया केली.
तीनवेळा अयशस्वी ठरलेल्या गर्भधारणेनंतर एक २८ वर्षीय गर्भवती एम्स रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेच्या पोटातील बाळाच्या हृदय व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर गुंतागुंत निर्माण होऊ शकली असती. त्यामुळे डॉक्टरांनी याबाबत पालकांना सूचित केलं. संभाव्य धोका टाळण्यासाठी बाळावर डायलेशन करावं लागेल, अशी सूचना डॉक्टरांनी पालकांना केली. सुखरूप बाळंतपण आणि बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी पालकांनी या शस्त्रक्रियेला परवानगी दिली.
अत्यंत सावधगिरी
ही प्रक्रिया अल्ट्रासाऊंड मार्गदर्शनाखाली केली जाते. शस्त्रक्रिया करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी स्पष्ट केले, “आम्ही आईच्या पोटातून बाळाच्या हृदयात सुई घातली. त्यानंतर, बलून कॅथेटरचा वापर करून, रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आम्ही बाधित वॉल्व उघडला. आम्हाला आशा आहे की बाळाच्या हृदयाचा आता चांगला विकास होईल. आणि जन्माच्या वेळी बाळाला असलेल्या हृदयरोगाची तीव्रता कमी असेल.” डॉक्टरांनी सांगितले की अशा प्रक्रियेमुळे गर्भाचा जीव धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत सावधगिरीने करावी लागते. सामान्यत: आम्ही सर्व प्रक्रिया अँजिओग्राफी अंतर्गत करतो, परंतु या प्रकरणात ते शक्य नव्हते. डॉक्टरांकडून लहानशी चूक झाली तरी ती बाळाच्या जिवाला धोका पोहोचवू शकते. त्यामुळे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि कठीण शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अवघ्या ९० सेकंदात पार पाडली.