हैदराबादी शायरीची नजाकत काही औरच ! हैदराबादी हिंदीचा मोठा प्रभाव मराठवाडी जनतेवर पडलेला असल्याने अनेकदा हैदराबादी सुर अन शब्द आणि सूर येथे ऐकायला मिळतो. प्रसिद्ध शायर खान यांची नही बोले तो, सुनते नही। ही शायरी हसून हसून पुरेवाट करणारीच. निवडणुकीच्या धामधुमीत एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहून वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे प्रकार होताहेत. संशयकल्लोळने घेरलेल्या एका उमेदवाराने चक्क मेरे घर मे रहके, बाता दुसरो के कर रे, या का खा के वा का गा रे, नही बोले तो सुनते नही असं म्हणत संतापला वाट करून दिली. त्याच्या या शायरीने उपस्थितांची मात्र हसून हसून पुरेवाट झाली. उमेदवाराची ही चिंता प्रातिनिधिक असली तरी सर्वत्र चित्र हेच आहे. सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते नही बोले तो सुनते नही अशाच पठडीतले ! सेनेला आपले कार्यकर्ते आवरता आवरता नाकी नऊ आलेत, कार्यकर्त्यांना प्रेमरोग होण्याच्या भीतीने काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादींच्या मागे पिंगा घालताहेत. काँग्रेसवाल्यांना समजावून समजावून एमआयएमवाले थकलेत. अपनी मनमानी तुम करते जा रे, नही बोले तो सुनते नही, नही करने के काम कर रे, नही बोले तो सुनते नही !असं म्हणत एमआयएम पक्षाचेच काम करा, असा सल्ला देऊ लागलेत. हर्षवर्धन जाधव यांना मात्र कोणती चिंता नाही. मिळेल तेवढे आपलेच गमवायचं काहीही नसल्याने हर्षवर्धन प्लस मध्येच आहेत. आमदार की नंतर आता खासदार की लगेच हात जोडून समोर उभी असल्याचे स्वप्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडू लागलेत. जालन्यात अर्जुनराव जरी दानवेंसोबत इश्क लढवत असले तरी औरंगाबादेत मात्र सेनेची महेबुबा रुसलीये. जिस सुरत पे मरते थे, कित्ती सिधी साधी थी, उसको मेकअप करते जा रे, नही बोले तो सुनते नही! वारंवार सांगूनही सेना सुरत बदलायला तयार नसल्याने भाजपवाले तोच तो मेकअप पाहायला कंटाळले आहेत. माझिया प्रियाला प्रित कळेना... हे गीत शिवसेना आळवत आहे. भाजपवाल्यांना आता प्रेमपाशात ओढावेच कसे याची चिंता धनुष्यबाणाला लागल्याने थेट उद्धव यांनीच हस्तक्षेप करीत ब्रेकअप स्टोरी ‘लव्ह स्टोरी’त बदलण्याचे आदेश दिले.
बरहुकूम अर्जुनरावांनी फिर वही दिल लाया हूँ म्हणत चार प्रेमाच्या गोष्टी सुनावल्या. पत्थर के सनम... जा अब याद ना आ, असे भाजपवाले म्हणाले. प्रेमी जोड्यांचं चांगलंच वाजलंय असं लक्षात आल्याने खोतकर यांनी दिल दिया है जान भी देंगे, गीत गात दोघांचे हात हातात देत पिया तोसे नैना लागेरे... सांगून टाकले. गई सो जवानी आती नही, फिरभी बाला काला कर रेे नही बोले तो सुनते नहीं म्हणत भाजपने तुणतुण चालूच ठेवल्याने तासभर बैठक लांबली. जो वादा किया वो निभाना पडेगा असं भाजपवाल्यांनी निक्षून सांगितलं.
खोतकरांनी प्रेम का प्याला पाजत आणाभाका दिल्या. आता या प्रेमरोगी जोड्यांची ताकत मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर दिसणार आहे. आ देखे जरा किसमे कितना है दम, म्हणत ओवेसीं सेनेचा बालेकिल्ला पश्चिममध्ये डरकाळी फोडणार तर एमआयएमच्या बालेकिल्ल्यात आज सेना गर्जना करणार आहे. या दोघांचीही प्रेम वार्ता शहरवासीयांना मंत्रमुग्ध करणार यात शंका नाही.