समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार उलटून 6 ठार, 5 गंभीर जखमी

Foto


मेहकर :  समृद्धी महामार्गावर मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला अपघात होऊन सहा जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. बहुतांश जखमी हे छत्रपती संभाजीनगर शहरातील एन ११ मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.


कुठे झाला अपघात
समृद्धी महामार्गावर मेहकर ते सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथे इर्टिगाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-११ येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.

कसा झाला अपघात
हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान झाला. भरधाव वेगातील इर्टिगा रस्त्यावरील डिव्हायडरला जाऊन धडकली आणि गाडी तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

देवदर्शनासाठी जात होते कर्मचारी
अपघातग्रस्त ईर्टीगाचा क्रमांक एम एच २० - ८९६२ आहे. एन-११ द्वारकानगरचे रहिवासी असून एमएसईबीचा कर्मचारी आहे. ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात होते.

 नगरसेवकाची कार असल्याची चर्चा
छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नगरसेवकाची कार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. अपघात एवढा भीषण होता की, समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर वाहतूक काही काळ पोलिसांनी थांबविली होती. तर या अपघातातील मृत आणि जखमी सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे.


लोकार्पणापासून ४० अपघात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत तयार झाला आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंत ४० हून अधिक अपघात झाले आहे. यात रविवारी सकाळी झालेला अपघात सर्वात मोठा मानला जात आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker