पराभवाने खचलेल्या सेनापतीच्या नेतृत्वात विधानसभेचा गड जिंकेल सेना ?

Foto

औरंगाबाद : राजकीय आयुष्यात एकही पराभव न पाहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना यावेळी एमआयएम ने पटकी दिली. या पराभवाचे शल्य खैरेंच्या इतके जिव्हारी लागले की, पराभव पाहण्या आधी मी मेलो का नाही ! असा संताप त्यांनी व्यक्त केला. सेनापतीचे हे उद्गार लाखो सैनिकांना हतबल करणारे आहेत. खचलेल्या सेनापतीच्या नेतृत्वात सेना आता विधानसभेचा गड जिंकेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

राजकीय कारकीर्दीत जय आणि पराजय तितक्याच समर्थपणे आणि धीरोदात्तपणे पचवावे लागतात. विजयाने हुरळून जाऊ नये अन पराभवाने खचून जाऊ नये. या दोन्ही बाबी मर्यादेत ठेवून कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. खैरेंच्या पराभवाने हजारो कार्यकर्ते निराश झाले आहेत, जिवापाड मेहनत करूनही पराभव झाल्याने कार्यकर्त्यांत मरगळ आली. अशावेळी खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून प्रेरणा देण्याचे काम नेत्याने करायला हवे. मात्र नेताच स्वतः जर खचलेल्या तुटलेल्या मनाने कार्यकर्त्यांसमोर जात असेल तर कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहतीलच कसे ? आक्रमकता, रांगडेपणा ही शिवसेनेची ओळख. मात्र, गेल्या काही वर्षात सेनेची ही ओळख पुसली जात आहे. एका पराभवाने खचून जाऊन कार्यकर्त्यांना नामउमेद करण्याची भाषा खैरेंनी का वापरली, असा सवाल विचारला जात आहे.  विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यांवर आल्या आहेत. जिल्ह्यात खैरे यांच्या नेतृत्वातच सेना विधानसभा निवडणुका लढवेल यात शंका नाही. त्यामुळे पराभवांने खचलेल्या नेता कार्यकर्त्यांना कशी उभारी देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 सहानुभूती गमावली 
खैरे यांचा पराभव विरोधकांच्या जिव्हारी लागला, यात शंका नाही. ज्या भाजप-सेनेच्या मतदारांनी यावेळी खैरेंना मतदान केले नाही त्यांना पश्चाताप होतोय अशी भावना जनमानसात आहे. याच सहानुभूतीच्या लाटेवर खैरेंनी स्वार व्हायला हवे होते. पराभवानंतर कार्यकर्त्यांचे सांत्वन करायला हवे होते. ही सहानुभूतीची लाट विधानसभेपर्यंत शाबूत राहील, याचीही खबरदारी सेनेने अर्थात खैरेंनी घ्यायला हवी होती. मात्र तिथेच खैरे चुकले. पराभव एवढा मनाला लावून घेतला की, त्यामुळे मिळालेली सहानुभूतीही गमावली असे बोलले जाते.

शहरातील तीनही मतदारसंघावर डोळा
 शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम या तीनही मतदारसंघावर शिवसेनेचा डोळा आहे. पूर्व मध्ये सेना जिंकू शकते, असा दावा खैरेंनी केला. भाजपच्या मतदारसंघावर सेनेने हक्क सांगितला असा अर्थ लावला जाऊ शकतो. गंगापूर आणि पूर्व या दोन्ही मतदारसंघात भाजपला धडा शिकवण्याचा खैरेंचा इरादा आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांतील मतभेदाची दरी वाढणार यात शंका नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker