छत्रपती संभाजीनगर : नाथषष्ठी निमित्ताने आज सकाळी औरंगपुरा येथील नाथ मंदिराच्या वतीने पालखी काढण्यात आली. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. यावेळी भानुदास एकनाथभानुदास एकनाथ..असा जयघोष करण्यात आला.
नाथषष्ठीनिमित्ताने औरंगपुरा येथे प्रतिदिन विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातच आज सकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी औरंगपुरा येथील नाथ मंदिरातून निघालेल्या पालखीत टाळकरी, वारकरी मंडळी सहभागी झाले. टाळ, मृदंगच्या गजरात पालखी काढण्यात आली. यावेळी फुलांनी सजवलेली पालखी, घोडे आणि रथचा समावेश होता. नाथपष्ठीनिमित्ताने आज सकाळी काकडा आरती करून पालखी काढण्यात आली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष ॲड. सदानंद देवे यांच्याहस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. भानुदास एकनाथांचा गजर करत पालखी निघाली.
जागोजागी रांगोळ्या
गुलमंडी, सिटीचाक, सराफा बाजार, गांधी पुतळा, संस्थान गणपती, किराणा चावडी, एक डोळा मारोती, सुपारी हनुमान मंदिर मार्गे गुलमंडी ते मंदिर अशी पालखी काढून मंदिरात पालखीचा समारोप करण्यात आला. यावेळी जागोजागी रांगोळ्या काढून पारंपरिकतेचे दर्शन यावेळी घडविले. यावेळी महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखीत सहभाग नोंदवला.